भारत 1962 च्या युद्धातील चूक पुन्हा करणार नाही, चीनला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 08:39 AM2017-08-10T08:39:50+5:302017-08-10T08:42:38+5:30
केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं की, भारताने 1962 च्या युद्धामधून शिकवण घेतली आहे आणि लष्कर कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास सक्षम आहे
नवी दिल्ली, दि. 10 - डोकलाम मुद्द्यावरुन भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला वाद अजूनही कायम असून चीनची युद्धाची धमकी देण्याची खोड काही केल्या जाताना दिसत नाही आहे. मंगळवारी चीनच्या सरकारी वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींना पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1962 मध्ये केलेली चूक पुन्हा न करण्याचा सल्ला दिला होता. तर बुधवारी युद्धाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे अशी चेतावणीही दिली होती. इकडे केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना सांगितलं की, भारताने 1962 च्या युद्धामधून शिकवण घेतली आहे आणि लष्कर कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास सक्षम आहे. अरुण जेटली यांनी आपल्या बोलण्यात डोकलामचा उल्लेख केला नसला, तरी चीनकडून येणा-या धमक्यांच्या पार्श्वभुमीवर त्यांचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.
तर स्वत:ला दोष देईल भारत
चीनी वृत्तपत्राने आपल्या संपादकीयमध्ये लिहिलं आहे की, डोकलाममधून भारताने माघार घेतली नाही तर नंतर स्वत:ला दोष देण्याखेरिज दुसरा कोणताच पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध नसेल. 'दोन्ही देशांमधील लष्करामध्ये युद्दाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. कोणताही मार्ग काढण्यास जागा नसेल अशी वाटचाल सध्या सुरु आहे. वाद सुरु होऊन सात आठवडे होत आहेत, आणि शांतता प्रस्थापित करण्याचे सर्व मार्गही बंद होताना दिसत आहेत', असंही संपादकीयमध्ये लिहिण्यात आलं आहे.
भारताला वारंवार समज देऊनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचंही वृत्तपत्रात लिहिण्यात आलं आहे. 'ज्यांच्याकडे ऐकण्यासाठी कान आणि पाहण्यासाठी डोळे आहेत त्यांच्याकडे हा संदेश पोहोचायला हवा होता. पण भारत शुद्धीत येण्यास नकार देत आहे, आणि आपलं सैन्यही मागे हटवत नाही आहे', असंही लिहिलं गेलं आहे.
'1962 मधून घेतला धडा'
चीनकडून सतत मिळणा-या युद्धाची धमकी मिळत असताना दरम्यान केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय सशस्त्र सेना देशाच्या सुरक्षेसाठी कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यास पुर्णपणे सज्ज आहे असं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आपण 1962 च्या युद्धातून धडा घेतला असल्याचा उल्लेखही केला.
'सैनिकांवर पुर्ण विश्वास'
त्यांनी सांगितलं की 'सशस्त्र सेनेला अजून सक्षम बनवण्याची गरज असल्याचा धडा भारतने चीनसोबत झालेल्या 1962 मधील युद्धातून घेतला आहे'. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'काही आव्हानं आजही आपल्यासमोर उभी आहेत याच्याशी मी सहमत आहे. काही लोकांची आपल्या सार्वभौमत्व आणि एकाग्रतेवर नजर आहे. मात्र आपणे वीर जवान देशाला सुरक्षित ठेवण्यामध्ये सक्षम आहेत यावर पुर्ण विश्वास आहे. मग येणारं आव्हान पुर्वेकडून येणार असो अथवा पश्चिमेकडून'.
याआधीही चीनने भारताला धमकी देताना डोकलाममधून माघार न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. डोकलाम आपला परिसर असल्याचा दावा चीन करत आहे. दोन्ही सैन्यांनी एकत्र माघार घ्यावी असा सल्ला भारताने चीनला दिला आहे. हा परिसर भूटानचा आहे असं भारताने सांगितलं आहे. मात्र चीन हे ऐकण्यास तयार नाही.