भारत पहिली गोळी चालवणार नाही
By admin | Published: September 12, 2015 02:57 AM2015-09-12T02:57:16+5:302015-09-12T02:57:16+5:30
आपल्या शेजारी देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास भारत इच्छुक आहे. त्यामुळे आमच्याकडून पाकिस्तानच्या दिशेने पहिली गोळी सुटणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह
नवी दिल्ली : आपल्या शेजारी देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास भारत इच्छुक आहे. त्यामुळे आमच्याकडून पाकिस्तानच्या दिशेने पहिली गोळी सुटणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी सीमा प्रश्नांवर चर्चेसाठी आलेल्या पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाला दिली.
यावर पाकिस्तान रेंजर्सचे महासंचालक मेजर जनरल उमर फारुख बुर्की यांनी मात्र आपल्या देशाच्या वतीने कुठलीही वचनबद्धता जाहीर करण्यास असमर्थता दर्शविली. गृहमंत्र्यांप्रमाणे मी नेतृत्वाचा हिस्सा नसून केवळ एका दलाचा महासंचालक आहे. त्यामुळे सिंग यांचा हा संदेश मी आमच्या देशाच्या नेतृत्वापर्यंत निश्चित पोहोचता करेन, असे ते म्हणाले.
बुर्की यांच्या नेतृत्वातील पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळ सीमा प्रश्नावर चर्चेकरिता तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहे. पाकिस्तानच्या बाजूने भारतात कुठल्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचनाही सिंग यांनी केली. भारत व पाकिस्तानने दहशतवादाच्या धोक्याचा एकजुटीने सामना केला पाहिजे, असे मत व्यक्त करताना ते म्हणाले की, दोन्ही देश दहशतवादाने पीडित असून पाकिस्तानसोबत विविध स्तरावर चर्चा करण्याची भारताची मनीषा आहे. त्या अनुषंगानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे रशियाच्या उफा येथे पाकिस्तानातील त्यांचे समकक्ष नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. दुर्दैवाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) स्तरावरील चर्चा होऊ शकली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)