अफगाणिस्तानात भारत सैन्य पाठवणार नाही, केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 05:52 PM2017-09-26T17:52:13+5:302017-09-26T17:57:19+5:30
भारत अफगाणिस्तानमध्ये लष्कराची तुकडी पाठवणार नाही, असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
नवी दिल्ली, दि. 26 - भारत अफगाणिस्तानमध्ये लष्कराची तुकडी पाठवणार नाही, असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भारतानं अफगाणिस्तानाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत, गरज पडल्यास त्याचं आम्ही सविस्तर विश्लेषण करू. केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेच्या समोरच भारत अफगाणिस्तानात सैन्य पाठवणार नसल्याचं सांगितलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्लीच अफगाणिस्तानच्या नव्या रणनीतीची घोषणा केली आहे. या रणनीतीत भारत सर्वाधिक सक्रिय भूमिका निभावेल, अशी आशा व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवेल, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. गेल्या 16 वर्षांपासून संघर्षग्रस्त अफगाणिस्तानात भारतीय लष्करानं दखल दिली नव्हती. अमेरिकेच्या अफगाणिस्तान रणनीतीत पाकिस्तानची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.
निर्मला सीतारामन आणि जेम्स मॅटिस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पाकिस्तानच्या मुद्द्यावरही छेडले असता, पाकिस्तानचा मुद्दा भारतानं अमेरिकेसमोर उपस्थित केल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणा-या शक्तींना नेस्तनाबूत करू, असंही या संयुक्त पत्रकार परिषदेत विधान जारी करण्यात आलं आहे. जेम्स मॅटिस म्हणाले, दहशतवाद्यांना सुरक्षितरीत्या आश्रय देणा-यांना सहन केलं जाणार नाही. भारत आणि अमेरिका दहशतवाद संपवण्यासाठी संयुक्तरीत्या काम करेल.
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत शुक्रवारच्या भाषणात दहशतवादावरून वाभाडे काढले होते. जशास तसे उत्तर देण्याच्या नादात पाकिस्तानने रविवारी स्वत:ची चांगलीच फजिती करून घेतली होती.
#WATCH: Defence Minister Nirmala Sitharaman and US Defence Secretary James Mattis issue joint press statement https://t.co/ZpecF56uQn
— ANI (@ANI) September 26, 2017
काश्मीरमध्ये कसे अत्याचार होतात हे दाखवण्याचा खोटा प्रयत्न करताना पाकिस्तानने गाझा हल्ल्याचा फोटो दाखवला असून, त्यामुळे जगभरात नाचक्की झाली होती. पाकिस्तानच्या राष्ट्रसंघातील स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी, उत्तर देण्याचा अधिकार बजावत, आमसभेपुढे उभ्या राहिल्या व स्वयंनिर्णयाचा ‘न्याय्य’ हक्क मागणा-या काश्मिरी जनतेवर भारत सरकार लष्कराकरवी कसे अनन्वित अत्याचार करीत आहे, याचे खोटेनाटे आरोप करत त्यांनी एक फोटो दाखविला. सुरक्षा दलांनी पेलेट गनचा मारा केल्याने एका काश्मिरी युवतीच्या चेह-याची कशी चाळण झाली, हे जगासमोर आणण्यासाठी लोधी यांनी फोटो दाखविला होता; परंतु प्रत्यक्षात हा फोटो काश्मिरी युवतीचा नसल्याचे लगेच स्पष्ट झाले. स्वराज यांनी त्यांच्या भाषणात पाकिस्तानला ‘दहशतवादाची निर्यात करणारा प्रमुख कारखाना’ असे संबोधले होते.