कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत भारत ब्रिटनला मागे टाकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 03:31 AM2020-06-12T03:31:56+5:302020-06-12T03:32:03+5:30
दररोज सुमारे दहा हजार नवे रुग्ण; मृत्यूदर मात्र घटला
नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येबाबत जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या ब्रिटनमध्ये ही संख्या २ लाख ९० हजारांपेक्षा जास्त आहे तर सहाव्या क्रमांकावरील भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता २ लाख ८६ हजारांहून अधिक झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत
ब्रिटनला मागे टाकण्याची चिन्हे दिसत आहेत.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी देशामध्ये कोरोनाचे ९,९९६ नवे रुग्ण आढळून आले. तसेच या एका दिवसात देशभरात ३५७ जणांचा बळी गेला. त्यामुळे भारतातील कोरोनाच्या बळींची एकूण संख्या ८१०५ पेक्षा अधिक झाली आहे. या आजारातून उपचारांनंतर आतापर्यंत १,४१,०२८ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. गेल्या दहा दिवसांत देशामध्ये दररोज कोरोनाचे सुमारे १० हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येत ९० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडली आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला आढळून आला होता. त्यानंतर शंभर दिवसांनी देशातील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखावर गेली. त्यापुढील पंधरवड्यात आणखी एक लाख रुग्ण वाढले. त्यानंतर ही रुग्णसंख्या तीन लाखांच्या जवळपास पोहोचण्यास अवघा एक आठवडा पुरला. जेवढ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यापेक्षा अधिक संख्येने रुग्ण बरे होण्याचा टप्पा भारताने बुधवारी ओलांडला. उपचार सुरू असलेले रुग्ण व बरे झालेले रुग्ण यांच्यातील संख्येचा फरक
मंगळवारी १,३७५ इतका होता. गुरुवारी तो ३५८० पर्यंत वाढला. देशात सध्या १,३७,४४८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या आठवड्यात दररोज ५३९७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन रुग्णालयातून आपापल्या घरी परतत आहेत. कोरोना आजाराचा भारतातील मृत्यूदर २.८ टक्के इतका कमी आहे. हा मृत्यूदरही मे महिन्याच्या अखेरीपासून कमी होण्यास सुरूवात झाली आहे.
५० लाखांहून अधिक कोरोना चाचण्या
च्देशात आजवर पार पडलेल्या कोरोनाच्या चाचण्यांनी बुधवारी ५० लाखांचा आकडा पार केला. मंगळवारपर्यंत कोरोनाच्या ५,०६१,३३२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. याचा अर्थ दर दहा लाख लोकांमागे देशात ३,७९७ लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. कोरोनाचा मोठा तडाखा बसलेल्या अन्य देशांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण भारतापेक्षाही अधिक आहे. इटलीमध्ये दर दहा लाख लोकांमागे ७५ हजार चाचण्या झाल्या आहेत.