अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र प्रणाली घेणार भारत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 09:03 AM2018-07-01T09:03:34+5:302018-07-01T09:04:32+5:30

रशियाकडून अत्याधुनिक S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली घेण्यासाठी भारतानं एक पाऊल पुढे टाकलं आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दबावाला झुगारून भारतानं हा निर्णय घेतला आहे.

India will take up the S-400 missile system by stopping US pressure | अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र प्रणाली घेणार भारत

अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र प्रणाली घेणार भारत

Next

नवी दिल्ली- रशियाकडून अत्याधुनिक S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली घेण्यासाठी भारतानं एक पाऊल पुढे टाकलं आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दबावाला झुगारून भारतानं हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेकडून निर्बंध लादले जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असतानाच भारताचं संरक्षण मंत्रालय 39 हजार कोटी रुपयांच्या S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी कराराच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी परिषदे(DAC)नं गुरुवारी रशियाकडून क्षेपणास्त्र प्रणाली घेण्यास अनुकूलता दर्शवली आहे. रशियाबरोबर झालेल्या व्यावसायिक चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली घेण्यासंदर्भातील हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील संरक्षण प्रकरणातील निर्णय हाताळणा-या कॅबिनेट समितीकडे पाठवण्यात येणार आहे. देशातील सर्वोच्च नेतृत्व यावर अंतिम निर्णय घेणार आहे.

अमेरिकेनं भारताबरोबरची 'टू-प्लस-टू' बैठक रद्द केल्यानंतर डीएसीची बैठक झाली आहे. या बैठकीत रशियाकडून S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली घेण्याचा ठराव झाला आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान 6 जुलै रोजी बैठका आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण सहभागी होणार होत्या. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ऐन वेळी या बैठका रद्द करण्यात आल्या. S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीच्या मुद्द्यावरून त्या बैठका रद्द केल्याची आता चर्चा आहे.

भारतानं S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली मिळवण्यासाठी एक योजना बनवली होती. या क्षेपणास्त्र प्रणालीच्या माध्यमातून शत्रूंची युद्धजहाजे, हेरगिरी करणा-या नौका, मिसाइल आणि ड्रोनला 400 किलोमीटरच्या टप्प्यात असताना हवेच्या 30 किलोमीटर वरच नेस्तनाबूत करता येणार आहे. भारताच्या संरक्षण दलात  S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली गेमचेंजर ठरणार आहे.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यादरम्यान ऑक्टोबर 2016ला गोव्यात झालेल्या बैठकीत S-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीवर सहमती झाली होती. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात S-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीच्या कराराला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. परंतु दुसरीकडे अमेरिकेनं भारताला असा करार न करण्याचा इशारा दिला आहे. भारत आणि रशिया सध्या अमेरिकेचा कायदा CAATSAपासून बचाव करण्याच्या योजना आखत आहेत.

अमेरिका या कायद्याच्या माध्यमातून दुस-या देशांना रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्याला मज्जाव करत आहे. भारत आणि रशियामध्ये असलेल्या प्रस्तावित करारानुसार भारतीय हवाई दलाला 24 महिन्यांनंतर व्यवस्थापन प्रणाली, रडार आणि लाँचरसह S-400 क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार आहे. त्यानंतर 60 महिने म्हणजेच 5 वर्षांच्या आत भारताला उर्वरित S-400 क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार आहेत. ज्या प्रत्येकात दोन फायरिंग युनिट बसवण्यात आले आहेत. S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणालीमुळे भारताला स्वतःच्या महत्त्वाच्या शहरांचं संरक्षण करता येणार आहे. 

Web Title: India will take up the S-400 missile system by stopping US pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.