हवाई हद्द बंदी उठविण्यासाठी भारताने पाकशी चर्चा करावी - विद्यार्थी, विविध देशांच्या राजदूतांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 03:27 AM2019-07-05T03:27:06+5:302019-07-05T03:27:31+5:30
पाकिस्तानने भारताला हवाई हद्द बंद केल्यानंतर हा तिकीट दर ६० हजार रुपये झाला आहे.
नवी दिल्ली : बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्ताननेभारताला हवाई हद्द बंद केली होती. ती उठविण्यासाठी मोदी सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी, अशी मागणी मध्य आशियातील देशांत शिकत असलेले भारतीय विद्यार्थी व विविध देशांच्या राजदूतांनी केली आहे.
कझाकस्तान या देशातील अल्माटी शहरातल्या कझाक राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठात एमबीबीएसच्या सहाव्या वर्षात शिकत असलेल्या आशुतोषकुमार सिंह या विद्यार्थ्याने सांगितले की, भारतातून कझाकस्तानला येण्यासाठी पूर्वी तिकीटाचा दर प्रत्येकी ३० हजार रुपये
होता.
पाकिस्तानने भारताला हवाई हद्द बंद केल्यानंतर हा तिकीट दर ६० हजार रुपये झाला आहे. इतके महागड्या दराचे तिकीट घेणे विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. ही स्थिती आम्ही तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना समाजमाध्यमांद्वारे कळविली होती. मात्र या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.
मध्य आशियाई देशातील कंपन्यांची जी विमाने भारतातून जातात त्यांना पाकिस्तानच्या हवाई
हद्द बंदीमुळे लांबचा वळसा
घालून आपल्या मुक्कामाला जावेलागते.
कझाकस्तानमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, आम्हाला जिथे जायचे आहे त्या प्रवासाशी संलग्न असलेले दुसरे
विमान मिळेपर्यंत मध्य आशिया
किंवा आखाती देशांच्या विमानतळावर कधी कधी दिवसभर किंवा
त्यापेक्षा जास्त वेळ ताटकळत बसावे लागते.
दिल्ली ते मॉस्को प्रवासाला आठ तास
पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोटवर हल्ला केला. तणाव असतानाही कर्तारपूर कॉरिडॉर विकसित करण्यासंदर्भात दोन्ही देशांत चर्चा सुरूच होती. या विषयाबद्दल जर चर्चा होऊ शकते तर हवाई हद्द बंदी उठविण्यासाठी भारताने पाकिस्तानशी चर्चा करायला हरकत नाही असे वैद्यकीय शाखेत शिकणाºया झुबेर या विद्यार्थ्याने म्हटले आहे.
रशियाच्या राजदूताने सांगितले की, भारतावरील पाकिस्तानची हवाई हद्द बंदी कधी उठते याची रशियादेखील वाट पाहत आहे. या बंदीमुळे दिल्लीहून मॉस्कोला विमानाने जाण्यासाठी सध्या आठ तास लागत आहेत. किव ते दिल्लीदरम्यानच्या प्रवासाचा कालावधी दोन तासांनी वाढला आहे, असे युक्रेनच्या राजदूताने म्हटले आहे.