भारत नेपाळी जनतेचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करेल - मोदी
By admin | Published: April 26, 2015 01:02 PM2015-04-26T13:02:46+5:302015-04-26T13:09:33+5:30
भूकंपासारख्या आपत्तीचे भयावह चित्र मी जवळून बघितले असून अशा संकटाच्या समयी भारत नेपाळी जनतेचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न करेल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - भूकंपासारख्या आपत्तीचे भयावह चित्र मी जवळून बघितले असून अशा संकटाच्या समयी भारत नेपाळी जनतेचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न करेल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.गेल्या काही दिवसांपासून लागोपाठ येणा-या नैसर्गिक आपत्तींमुळे दुःखी झालो आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमाव्दारे संवाद साधला. यात त्यांनी नेपाळ व उत्तर भारतात आलेल्या भूकंपाविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 'संकटाच्या समयी भारत तुमच्यासोबत असून नेपाळी जनतेचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु असे सांगत मोदी म्हणाले, गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने भारतात शेतीचे अतोनात नुकसान झाले, आता नेपाळ व उत्तर भारतात भूकंपाचा धक्का बसला आहे, लागोपाठ येणा-या या नैसर्गिक संकटांमुळे दुःखी झालो असून आज मन की कार्यक्रम करायची इच्छाही नव्हती असे त्यांनी नमूद केले. २६ जानेवारी २००१ मध्ये गुजरातमध्ये आलेला भूकंप मी जवळून बघितला असल्याने नेपाळी जनतेचे दुःख मी समजू शकतो असे मोदींनी नमूद केले.
नेपाळमध्ये सध्या बचावकार्यावर भर देणे गरजेचे असून अनेक जण ढिगा-याखाली अडकले आहेत. या सर्वांची जीवंत सुटका व्हायला हवी. यानंतरच तिथे दिर्घकाळ पुनर्वसनाची मोहीम राबवावी लागेल असे मोदींनी स्पष्ट केले. तसेच वर्ल्डकप सेमीफायनलमध्येे भारतीय संघाचा पराभव झाल्यावर ज्यापद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त झाल्या ते अयोग्य होते असेही मोदींनी आवर्जून सांगितले.