...तर भारताने 2007 मध्येच ताकद दाखविली असती; इस्रोच्या माजी संचालकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 08:18 PM2019-03-27T20:18:34+5:302019-03-27T20:19:10+5:30
जी माधवन नायर यांनी हा दावा केला आहे.
हैदराबाद : भारताने अंतराळामध्ये उपग्रह पाडण्याची शक्ती मिळविल्याने इस्रो आणि डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे कौतुक होत आहे. मात्र, इस्रोच्या माजी संचालकांनी भारत ही ताकद 2007 मध्येच दाखवू शकला असता, पण राजकीय इच्छाशक्तीच नव्हती असा खुलासा केला आहे. चीनने 2007 मध्ये ही चाचणी केली होती. त्यावेळी भारताकडेही असे तंत्रज्ञान बनविण्याची शक्ती होती असेलही त्यांनी सांगितले.
जी माधवन नायर यांनी हा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याद्वारे राजकीय इच्छाशक्ती असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांच्यात तेवढी हिंमत आहे, असेही त्यांनी सांगितले. नायर हे स्पेस कमिशनचे प्रमुख राहिले आहेत. तसेच 2003 ते 2009 मध्ये डिपार्टमेंट ऑफ स्पेसचे सचिवही राहिले आहेत.
जेव्हा नायर यांना विचारले गेले की, 2007 मध्ये भारत अशी चाचणी घेऊ शकत होता का? यावर त्यांनी होय असे उत्तर दिले. तसेच तेव्हाची राजकीय इच्छाशक्ती कमी असल्याने ते शक्य नव्हते, असेही त्यांनी सांगितले.
तर डीआरडीओचे माजी प्रमुख व्ही. के. सारस्वत यांनी सांगितले की , आम्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या समोर प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तेव्हाच्या सरकाराने हा प्रस्ताव सकारात्मक घेतला नाही. यामुळे आम्ही पुढे काहीच करू शकलो नाही.
डॉ. सारस्वत यांनी सांगितले की, जेव्हा सध्याचे डीआरडीओ प्रमुख सतीश रेड्डी आणि अजित डोवाल यांनी मोदींमसोर हा प्रस्ताव पुन्हा मांडला होता. पंतप्रधान मोदींनी धाडस दाखवत या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखविला. हेच जर 2012-13 मध्ये केंद्र सरकारने मंजुरी दिली असती तर 2014-15 मध्येच ही चाचणी पार पडली असती, असेही त्यांनी सांगितले.