हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; पहिल्यांदाच रात्रीच्या अंधारात कारगिलमध्ये विमानाचे लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 01:54 PM2024-01-07T13:54:36+5:302024-01-07T13:56:12+5:30
भारतीय हवाई दलाने पहिल्यांदाच रात्रीच्या काळोखात हरक्यूलिस विमानाची कारगिलमध्ये सुरक्षित लँडिंग केली आहे.
IAF C-130J Aircraft Landing Video:भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) एक अतिशय आव्हानात्मक कामगिरी केली आहे. हवाई दलाने (IAF) पहिल्यांदाच रात्रीच्या काळोखात C-130J हरक्यूलिस विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्याची किमया केली आहे. विशेष म्हणजे, ही ऐतिहासिक लँडिंग भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असणाऱ्या कारगिल हवाई पट्टीवर करण्यात आली आहे. या कारनाम्याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.
हवाई दलाचे C-130J हरक्यूलिस विमानाच्या नाईट लँडिंगचा व्हिडिओ शेअर करताना सांगितले की, हवाई दलाने पहिल्यांदाच अशाप्रकारची कामगिरी केली आहे. या सरावादरम्यान टेरेन मास्किंगचे काम करण्यात आले आणि गरुड कमांडोही तैनात करण्यात आले होते. मात्र, सुरक्षेच्या पार्ष्वभूमीवर हवाई दलाने प्रशिक्षण मोहिमेबाबत अधिक माहिती दिलेली नाही.
In a first, an IAF C-130 J aircraft recently carried out a night landing at the Kargil airstrip. Employing terrain masking enroute, the exercise also dovetailed a training mission of the Garuds.#SakshamSashaktAtmanirbharpic.twitter.com/MNwLzaQDz7
— Indian Air Force (@IAF_MCC) January 7, 2024
कारगिलमध्ये IAF ने इतिहास रचला
भारतीय वायुसेनेने रात्री ज्या ठिकाणी लँडिंग केले, ते ठिकाण समुद्रसपाटीपासून 8,800 फुटांपेक्षा जास्त उंचीवर आहे. उंच डोंगरांमध्ये दिवसाही लँडिंग कठीण असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी हे काम करून भारतीय हवाई दलाने इतिहास रचला आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत, विशेषतः अंधारात C-130J विमानाचे यशस्वीपणे लँडिंग करुन वैमानिकांनी त्यांचे कौशल्य दाखवले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हवाई दलाने दोन C-130J-30 'सुपर हरक्यूलिस' लष्करी वाहतूक विमाने उत्तराखंडमधील अवघड अशा हवाई पट्टीवर यशस्वीरित्या उतरवली होती. निर्माणाधीन बोगद्याच्या आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी लागणारी उपकरणे घेऊन हे विमान आले होते. याशिवाय, गेल्या वर्षीच सुदानमध्येही रात्रीच्या धाडसी मोहिमेसाठी या विमानाचा वापर केला होता.