उत्तर सीमेवर वायुदलाने दाखवली ताकद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 03:56 AM2020-10-09T03:56:23+5:302020-10-09T03:56:40+5:30
राफेलसह लढाऊ विमानांचे हवाई संचलन
हिंडन (गाझियाबाद) : भारतीय वायुदलाने उत्तर सीमेवर मोहीम क्षमता आणि गरज पडेल तेव्हा शत्रूचा प्रभावीपणे मुकाबला करण्याचा दृढनिश्चय दाखविला आहे, असे अभिमानपूर्वक सांगत वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल आर.के. एस. भदौरियांनी पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सीमावादावरून निर्माण झालेल्या कोंडीदरम्यान तत्पर प्रतिक्रियेबद्दल हवाई योद्ध्यांची प्रशंसा केली.
भारतीय वायुदलाच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही परिस्थितीत राष्टÑीय सार्वभौमत्व आणि हिताच्या रक्षणासाठी भारतीय फौजा सदैव सज्ज राहून क्षमता सातत्याने वाढवीत राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. पूर्व लडाखमधील सुरक्षेसंबंधीच्या आव्हानांचा उल्लेख करताना त्यांनी अत्यंत कमी वेळेत प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) युद्ध सामग्रीसह तैनात करणे आणि उत्तर सीमेवरील कोंडीदरम्यान दाखलविलेल्या तत्परतेबद्दल वायुदलाच्या योद्ध्यांची प्रशंसा केली.
राष्टÑपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांनी वायुदलाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत वीर योद्ध्यांना सलाम केला. यावेळी हिंडन हवाईतळावर पार पडलेल्या शानदार हवाई संचलनात राफेलसह, तेजस, जग्वार, मिग-२९, मिग-२१, सुखोई-३० या लढाऊ विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून वायुदलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडविले.