अभिनंदन नीडरपणे F16ला भिडला अन् 'तिनं' कंट्रोल रूममधून पाकचा डाव उधळला!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 11:54 AM2019-04-04T11:54:34+5:302019-04-04T11:55:06+5:30
भारतीय हवाई दलाच्या एअरस्टाइकमुळे चवताळलेल्या पाकिस्तानच्या हवाई दलाने दुसऱ्या दिवशी भारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
नवी दिल्ली - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हवाई हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राइक केली होती. मात्र या एअरस्टाइकमुळे चवताळलेल्या पाकिस्तानच्या हवाई दलाने दुसऱ्या दिवशी भारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाकिस्तानचा ह हल्ला भारताच्या हवाई दलाने हाणून पाडला होता. दरम्यान, हा हल्ला परतवून लावताना विंग कमांडर अभिनंदर वर्धमान यांनी दाखवलेल्या शौर्याची खूप चर्चा झाली. मात्र ही मोहीम यशस्वी करणारे अनेक चेहरे पडद्यामागेच राहिले. त्यांच्यामध्ये एका महिला स्क्वॉड्रन लीडरचाही समावेश होता. हवाई दलाचे जवान आकाशामध्ये पाकिस्तानी विमानांचा सामना करत असताना या महिला अधिकाऱ्याने कंट्रोल रूममधून सतर्कता आणि समजदारी दाखवत पाकिस्तानचा डाव हाणून पाडण्यात मोलाचा वाटा उचलला.
या महिला अधिकाऱ्याचे नाव समोल आलेले नाही. तसेच सुरक्षेच्या कारणांमुळे ते समोर येणारही नाही. मात्र आणीबाणीच्या प्रसंगी तिने दाखवलेल्या प्रसंगावधानाचा हवाई दलाकडून गौरव होणार आहे. तसेच विशिष्ट्य सेवा पदकासाठी हवाई दलाकडून या महिला अधिकाऱ्याच्या नावाची शिफारस होणार आहे.
ही महिला स्क्वॉड्रन लीडर हवाई दलामध्ये फायटर कंट्रोलर म्हणून काम पाहत आहे. सध्या पंजाबमधील आयएएफच्या एका रडार कंट्रोल स्टेशनवर त्यांची पोस्टिंग आहे. 27 फेब्रुवारी रोजी जेव्हा पाकिस्तानी हवाई दलाच्या सुमारे 24 एफ-16, जेएफ-17, आणि मिराज 5 विमानांनी हल्ला केला तेव्हा या महिला अधिकाऱ्याने तणावपूर्ण परिस्थितीचा धैर्याना सामना केला. तसेच भारताच्या वैमानिकांना पाकिस्तानी विमानांची माहिती सातत्याने देत राहिली.
भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान प्रतिहल्ला करणार हे निश्चित होते. त्यामुळे भारतीय हवाई दलाकडून असा हल्ला परतवून लावण्यासाठी पूर्वतयारी करण्यात आली होती. पाकिस्तानी विमाने भारताच्या हद्दीत घुसल्याचा अंदाज येताच या महिला अधिकाऱ्याने कंट्रोल रूममधून दोन सुखोई आणि दोन मिराज विमानांना अलर्ट केले. तसेच पाकिस्तानी जेट्ससुद्धा येत असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी 6 मिग विमानांना श्रीनगर येथून प्रयाण करण्यास सांगितले. भारताची मिग विमाने हवेत झेपावल्याचे पाहताच पाकिस्तानी पायलट्सना धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. तसेच पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनी सुद्धा हल्ला केला असून, त्यावर मध्यम पल्ल्याचे AIM-120C अॅडव्हान्स क्षेपणास्त्र असल्याची माहितीसुद्धा याच महिला स्क्वॉड्रन लीडरने दिली होती.
27 फेब्रुवारी रोजी दोन्ही देशांच्या विमानांमध्ये झालेल्या हवाई चकमकीत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानच्या एफ-16 विमानाची शिकार केली होती. तसेच या चमकीदरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्यात विमाना दुर्घटनाग्रस्त झाल्याने ते पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.