Abhinandan Varthaman: बालाकोट 'एअर स्ट्राइक'चे हिरो अभिनंदन यांचं प्रमोशन, ग्रूप कॅप्टनची रँक मिळाली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 05:39 PM2021-11-03T17:39:11+5:302021-11-03T17:39:49+5:30
Abhinandan Varthaman: बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो आणि भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं प्रमोशन झालं आहे. अभिनंदन वर्धमान यांना आता ग्रूप कॅप्टनची रँक मिळाली आहे.
नवी दिल्ली
बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो आणि भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं प्रमोशन झालं आहे. अभिनंदन वर्धमान यांना आता ग्रूप कॅप्टनची रँक मिळाली आहे. पाकिस्तानच्या एफ-१६ या फायटर विमानांना प्रत्युत्तर देणाऱ्या अभिनंदन यांना याआधी शौर्य चक्र पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं आहे. अभिनंदन यांनी बालाकोट एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानला तोडीस तोड प्रत्युत्तर देत पाकचं अमेरिकन बनावटीचं एफ-१६ फायटर विमान पाडलं होतं.
बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक केल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्ताननं आपल्या १० लढाऊ विमानांना भारताच्या हद्दीत पाठवलं होतं. त्यांना पळवून लावण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या मिग-२१ विमानांनी उड्डाण घेतलं होतं. यातील एका विमानाचे अभिनंदन पायलट होते. त्यांनी पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांना जशात तसं प्रत्युत्तर देत पाकचं एक विमान पाडलं होतं. अभिनंदन यांनी पाक विमान पाडलं खरं पण त्यांचंही विमान भरकटून पाकिस्तानात गेलं होतं. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अभिनंदन यांचं विमान कोसळलं होतं. सुदैवानं अभिनंदन यांचा जीव वाचला होता. पण पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना अभिनंदन यांना पकडून त्रास दिला होता. त्यानंतर पाक सैन्याकडे त्यांना सोपविण्यात आलं होतं.
एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानात काय घडलं?
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधील परिस्थिती काय होती, याची माहिती संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी दिली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी अयाज सादिक यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. 'भारत हल्ला करेल या भीतीनं तेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय कापत होते. त्यांच्या चेहऱ्यावर घाम अगदी स्पष्ट दिसत होता. बाजवा यांना भारताच्या हल्ल्याची भीती वाटत होती,' असं सादिक संसदेत बोलताना दिसत आहेत. या बैठकीला परराष्ट्रमंत्री महमूद शाह कुरेशी उपस्थित होते, अशी माहितीही सादिक यांनी दिली. 'कुरेशी त्या बैठकीला उपस्थित असल्याचं मला आठवतं. त्या बैठकीला हजर राहण्यास पंतप्रधान इम्रान खान यांनी नकार दिला होता. कुरेशी यांचे पाय कापत होते. त्यांना घाम फुटला होता. अभिनंदन यांची सुटका करा. अन्यथा भारत हल्ला करेल, असं आम्ही कुरेशी यांनी म्हटलं होतं,' असं सादिक यांनी संसदेला सांगितलं होतं.