हवाईदलाला मिळणार अधिक बळकटी; १.३ लाख कोटींना ११४ फायटर जेट खरेदी करण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 07:30 PM2021-01-31T19:30:25+5:302021-01-31T19:33:09+5:30
एअरो इंडियादरम्यान बंगळुरूमध्ये ५० हजार कोटी रूपयांच्या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता
आगामी एअरो इंडियादरम्यान ८३ LCA Tejas Mark 1A विमानांच्या करारावर शिक्कामोर्तब करण्यासोबतच भारतीयहवाईदल आता मल्टीरोल लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या योजनेवर लक्ष केंद्रित करत आहे. या अंतर्गत १.३ लाख कोटी रूपयांना ११४ लढाऊ विमानं खरेदी करण्यावर विचार सुरू आहे. हवाईदल एक लढाऊ विमान योजनेवर काम करत होती. आता याच्या ८३ LCA Tejas Mark 1A फायटर जेटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. एअरो इंडियादरम्यान बंगळुरूमध्ये ५० हजार कोटी रूपयांच्या करारावर स्वाक्षरी करण्याचीदेखील तयारी सुरू आहे.
सरकारी सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार ८३ LCA तेजस मिग-२१, फायटर जेट्सच्या चार स्क्वाड्रनची जागा घेतील. आता ११४ फायटर जेट्स प्रोजेक्टवर काम केलं जाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. भारतीय हवाईदलानं या निविदेसाठी माहिती मागण्याकरिता यापूर्वीच निवेदन पाठविले आहे आणि लवकरच या प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालयाकडे मान्यता (एओएन) मिळण्यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार आहे. हे 4.5 प्लस श्रेणीतील विमानांच अधिग्रहण करण्यास सक्षम करेल.
३६ राफेल विमानं भारतीय हवाईदलात सामील करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी सुरू करण्यात आली आहे. रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशनचं उत्तर अनेक जागतीक कंपन्यांनी दिलं आहे. यामध्ये अमेरिका, फ्रान्स, रशिया आणि स्वीडनमधील फायटर जेट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिका एफ-15 स्ट्राइक ईगल, एफ -18 सुपर हॉर्नेट आणि एफ-16 व्हेरिएंटला एफ -21 च्या नावानं सादर करण्याची शक्यता आहे. तर फ्रान्स लढाऊ जेटसोबतच निविदा प्रक्रियेत सहभागी होईल. यापूर्वी हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी ११४ लढाऊ विमानं अधिग्रहणाच्या योजनेसाठी राफेल एक चांगला दावेदार असल्याचं म्हटलं होतं.
प्रकल्पातील निवडीचा मुख्य पैलू म्हणजे प्रस्तावाची किंमत तसंच विमानाची क्षमता ही असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसंच भारतीय हवाईदल ज्या आधारावर लढाऊ विमानांची निवड करणार आहे त्याचे मापदंड तयार करत आहे. यामध्ये सिंगल आणि ड्युअल इंजिन अशा दोन्ही प्रकारांची लढाऊ विमानं असतील. ही ११४ लढाऊ विमानं मेड इन इंडिया असतील असंही सूत्रांनी सांगितलं.