Indian Air Strike on Pakistan: ...म्हणून भारताने एअर स्ट्राइकसाठी निवडलं बालाकोट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 02:08 PM2019-02-26T14:08:52+5:302019-02-26T15:03:59+5:30
भारतीय हवाई दलाने मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून धडाकेबाज कारवाई करत जैश ए मोहम्मदचं कंबरडं मोडलं.
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाने मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून धडाकेबाज कारवाई करत जैश ए मोहम्मदचं कंबरडं मोडलं. पुलवामातील हल्ल्याची जबाबदारी जैशने स्वीकारली होती. या हल्ल्याच्या सुत्रधारांचा भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलिसांनी 100 तासांमध्ये खात्मा केला. मात्र आपल्या 40 जवानांचे प्राण घेणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडवा, अशी मागणी जोर धरत होती. यानंतर आज सकाळी हवाई दलाच्या कारवाईची माहिती समोर आली.
भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री तीन ते साडेतीन दरम्यान बालाकोट, मुझ्झफराबाद, चिकोटीवर बॉम्ब हल्ले केले. जैश ए मोहम्मदच्या दृष्टीने यातील बालाकोटचं महत्त्व फार मोठं आहे. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरची कंदहार प्रकरण घडलं. त्यावेळी भारताला अजहरची सुटका करावी लागली. त्यानंतर अजहरने त्याचा मोठा तळ बालाकोटमध्ये उभारला. भारतीय हवाई दलाने याच तळाला लक्ष्य करत जैशला मोठा दणका दिला.
भारताने कारवाईसाठी बालाकोटची निवड करण्यामागे आणखी एक कारण आहे. बालाकोट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून 160 किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे हा भाग पाकव्याप्त काश्मीरमध्ये येत नाही. बालाकोट पाकिस्तानच्या खैबर पख्तुन प्रांतात येतो. भारतीय हवाई दलाची विमानं काही अंतर आत आली, असा दावा पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला. मात्र या दाव्यात अजिबात तथ्य नाही. कारण बालाकोट भारतीय सीमेपासून 40 किलोमीटर दूर आहे.
Just to be clear: #Balakot is not in Azad Kashmir.
— Mosharraf Zaidi (@mosharrafzaidi) February 26, 2019
If Indian Air Force planes dropped payload in Balakot, they crossed across the LOC, and then across the entirety of Azad Kashmir, and then into Khyber Pakhtukhwa.
India didn't "cross the LOC".
It has attacked Pakistan.
पाकिस्तानातील काही पत्रकारांनी दिलेल्या माहितीवरुन बालाकोटचं महत्त्व अधोरेखित होतं. 'बालाकोट स्वतंत्र काश्मीरमध्ये नाही. जर भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये बॉम्ब टाकले असतील, तर ते नियंत्रण रेषा ओलांडून आत आले होते. याचा अर्थ ते स्वतंत्र काश्मीर ओलांडून पुढे आले होते. बालाकोट खैबर पख्तुन भागात आहे. त्यामुळे भारताने केवळ नियंत्रण रेषाच ओलांडलेली नाही, तर पाकिस्तानवर हल्ला केला आहे, असं ट्विट पाकिस्तानी पत्रकार मुशर्रफ जैदी यांनी केलं आहे. यावरून भारतीय हवाई दलाने किती मोठी आणि महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे, याचा अंदाज येतो.