Indian Air Strike on Pakistan: भारताच्या 'जेम्स बॉण्ड'ने पुन्हा करून दाखवलं; अजित डोवाल ठरले 'हिरो'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 02:45 PM2019-02-26T14:45:18+5:302019-02-26T14:46:57+5:30
Indian Air Strike on Pakistan: मोदींचे खास आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणारे अजित डोवाल हेही या हल्ल्यासंदर्भातील बैठका आणि योजनेत सहभागी असल्याचं समजतयं
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून, भारतीय वायुदलाची 12 मिराज विमानं आज पहाटे बालाकोटमध्ये जाऊन 1000 किलोचे बॉम्ब टाकून, जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करून शान से परतली. सर्जिकल स्ट्राइकनंतर एअर स्ट्राइक करून त्यांनी पाकिस्तानला जबरदस्त हिसका दिलाय. या कारवाईत 250 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं समजते. या मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय सैन्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. तसेच, या मोहिमेत भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही महत्वाची भूमिका असल्याचे समजते.
या कामगिरीबद्दल भारतीय लष्कराचं कौतुक होत असतानाच सोशल मीडियावरुन अजित डोवाल यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे. यापूर्वी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्येही अजित डोवाल यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर आज बालाकोटमध्ये जवळपास 3.45 वाजता, मुजफ्फराबादमध्ये 3.48 वाजता, तर चाकोटीमध्ये 3.58मध्ये प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला केला आहे. भारतीय हवाई दलाच्या मिराज 2000 ची 12 लढाऊ विमानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी तळांवर हल्ले करत होती. त्यावेळी मोदी साऊथ ब्लॉकमध्ये होते आणि कंट्रोल रुममधून त्यांचं पूर्ण मोहिमेवर लक्ष होतं.
मोदींचे खास आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणारे अजित डोवाल हेही या हल्ल्यासंदर्भातील बैठका आणि योजनेत सहभागी असल्याचं समजतयं. त्यामुळेच या हल्ल्यानंतर भारतीय वायू सेना, भारतीय लष्कर, पतप्रधान नरेंद्र मोदी आणि NSA अजित डोवाल यांचेही कौतुक केलं जात आहे. दरम्यान, भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईनंतर एनएसए अजित डोवाल यांनी भारतीय लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि भारतीय वायू सेनेचे प्रमुख बीएस धनोआ यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच देशाच्या सीमा भागातील सुरक्षेसंदर्भात आढावाही घेतला आहे.
NSA Ajit Doval along with Indian Army Chief Bipin Rawat and IAF Chief BS Dhanoa is reviewing the security situation on the borders after #IndianAirForce strikes at JeM terror camp in Balakot across LoC. pic.twitter.com/LAu3dMPohE
— ANI (@ANI) February 26, 2019
पुलवामाचा हल्ला हा सुरक्षा दलांच्या जिव्हारी लागला होता. तर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी उच्च स्तरावरुन चर्चाही सुरू होती. त्यानुसारच, उरीच्या हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकप्रमाणेच पुलवामा हल्ल्यानंतरही एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.