Air Strike: ''मोदी ने मारा' म्हणत पाकिस्तानच रडू लागला; तरी काहींना शंका वाटतेय!' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 06:58 PM2019-03-09T18:58:42+5:302019-03-09T19:09:42+5:30

हे लोक भारताचं मीठ खाऊन पाकिस्तानला मदत करताहेत.

Indian Air Strike: we kept quiet but pakistan began crying, Narendra Modi slams Oppositions | Air Strike: ''मोदी ने मारा' म्हणत पाकिस्तानच रडू लागला; तरी काहींना शंका वाटतेय!' 

Air Strike: ''मोदी ने मारा' म्हणत पाकिस्तानच रडू लागला; तरी काहींना शंका वाटतेय!' 

googlenewsNext

नोएडाः 'सर्जिकल स्ट्राईक केला, तेव्हा आम्ही जनतेला त्याची माहिती दिली होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आम्हाला जे करायचं होतं, ते आम्ही केलं. त्यानंतर आम्ही गप्पच होतो. पण पहाटे पाच वाजता पाकिस्ताननंच रडायला सुरुवात केली. 'मोदी ने मारा, मोदी ने मारा' म्हणत ते रडू लागले. तरीही, आपल्याकडच्या काही लोकांना पुरावे हवेत. एअर स्ट्राईक खरंच झाला का, याबद्दल त्यांना शंका वाटतेय. हे लोक भारताचं मीठ खाऊन पाकिस्तानला मदत करताहेत, अशी चपराक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावली. 

भारताच्या खणखणीत उत्तरामुळे दहशतवाद्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पण, आता आपण देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहायला हवं, असा चिमटाही मोदींनी विरोधकांना काढला.

पाकिस्तानमधील बालाकोट इथल्या दहशतवाद्यांच्या तळांवर 'एअर स्ट्राईक' करून भारतीय वायुसेनेनं 'पुलवामा'चा बदला घेतला. कूटनीतीच्या जोरावर भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावरही कोंडी केली. सुरुवातीला सगळ्यांनीच या चोख प्रत्युत्तराचं स्वागत केलं होतं. परंतु, गेल्या काही दिवसांपासून, या विषयाला राजकीय वळण लागलंय. सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी पुरावे मागणाऱ्या नेत्यांना, एअर स्ट्राईकचेही पुरावे हवे आहेत. कारण, लोकसभा निवडणूक जवळ आल्यानं केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या एअर स्ट्राईकचा राजकारण करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. या विरोधकांना मोदींनी आज पुन्हा धारेवर धरलं.  

पाकिस्तानला वाटत होतं मोदी सरकार पुन्हा 'सर्जिकल स्ट्राईक' करेल. पण आपण हवेतून हल्ला केला. जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्याबद्दल आम्ही काहीच भाष्य केलं नव्हतं. पण, पाकिस्ताननेच ट्विटरवरून रडारड सुरू केली. म्हणजेच, त्यांनी एअर स्ट्राईक झाल्याचं मान्य केलंय. भारतीय वायुसेनेनंही लक्ष्य अचूक भेदल्याचं सांगितलंय. तरीही, आपल्याकडच्याच काही लोकांना या कामगिरीबद्दल संशय आहे. हे दुर्दैवी आहे, असं नरेंद्र मोदींनी सुनावलं.  

ज्यांच्या धमन्यांमधून भारतीय रक्त वाहतं, त्यांना एअर स्ट्राईकबद्दल संशय वाटतोय का? जे 'भारत माता की जय' असा जयघोष करतात, त्यांना शंका आहे का? मग जे संशय घेताहेत, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का, असा प्रश्न मोदींनी उपस्थितांना विचारला. एकवेळ या मोदीवर विश्वास ठेवू नका, पण भारतीय जवानांवर संशय घेऊन त्यांचं मनोधैर्य खच्ची करू नका, असा 'स्ट्राईक' मोदींनी आधीही विरोधकांवर केला होता.  

Web Title: Indian Air Strike: we kept quiet but pakistan began crying, Narendra Modi slams Oppositions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.