India China Conflict: ड्रॅगनचा डाव उधळला! चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं; सॅटेलाईट इमेज आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 08:12 AM2022-12-13T08:12:44+5:302022-12-13T08:14:29+5:30
ही घटना ९ डिसेंबरची आहे. माहितीनुसार, सुनियोजित कटाचा भाग म्हणून चीनचे सैन्य ३०० सैनिकांसह यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी पोहोचले होते.
नवी दिल्ली - भारतीय लष्कराने LAC वर चीनचा डाव पुन्हा एकदा हाणून पाडला आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से भागात भारतीय लष्कर आणि चिनी लष्करामध्ये जोरदार चकमक झाली. हे चिनी सैनिक भारतीय लष्कराची चौकी हटवण्यासाठी आले होते. पण भारतीय सैनिकांच्या तत्परतेने चिनी सैनिकांचे मनसुबे उद्ध्वस्त केले. या चकमकीत दोन्ही सैन्याचे काही जवान जखमी झाले. दरम्यान, त्या परिसरातील सॅटेलाइट फोटो समोर आला आहे. जिथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती.
ही घटना ९ डिसेंबरची आहे. माहितीनुसार, सुनियोजित कटाचा भाग म्हणून चीनचे सैन्य ३०० सैनिकांसह यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी पोहोचले होते. चिनी सैनिकांकडे लाठ्या-काठ्याही होत्या. मात्र भारतीय जवानांनी तात्काळ मोर्चेबांधणी केली. यानंतर दोन्ही सैन्यात झटापट झाली. भारतीय सैनिकांचं आक्रमक रुप पाहून चिनी सैनिक मागे हटले. चिनी सैनिकांनी दगडफेक केल्याचंही पुढे आले आहे. या संघर्षात दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. भारताच्या ६ जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आले आहे.
चिनी सैनिक भारतीय चौकीवर हल्ला करण्यासाठी १५ दिवसांपासून तयारी करत होते. सोमवारी त्यांनी ठरलेल्या रणनीतीनुसार १७ हजार फूट उंचीवर पोहचले. मात्र चिनी सैनिकांना पाहताच आधीच तयारीत असलेल्या भारतीय जवानांनी सतर्कता बाळगली. त्यानंतर झालेल्या झटापटीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले आहेत.
भारतीय लष्कराकडून निवेदन जारी
या घटनेबाबत भारतीय लष्कराने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटलंय की, आम्ही चीनचा डाव हाणून पाडला. अरुणाचल प्रदेशात LAC च्या नजीक काही भाग आहेत ज्याठिकाणी सर्व क्षेत्रे येतात. इथे दोन्ही देशांमधला समज वेगळा आहे. दोन्ही देश आपापल्या बाजूने हक्काच्या रेषेपर्यंत गस्त घालतात. हा २००६ पासून ट्रेंड करत आहे. ९ डिसेंबर २०२२ रोजी, चीनी सैन्याने LAC सेक्टरमध्ये पुढे सरकले. ज्याचा आमच्या सैन्याने मोठ्या जोमाने आणि ताकदीने सामना केला. नंतर, दोन्ही देशांचे सैनिक तेथून माघारले, पाठपुरावा म्हणून, भारत आणि चिनी कमांडर्समध्ये फ्लॅग मिटिंग झाली आणि चर्चा केली. या बैठकीत शांततेवर चर्चा झाली.