चीन-पाकला एकत्रितरित्या तोंड देण्यास भारत सज्ज; आता १० ऐवजी १५ दिवसांचा युद्धसाठा ठेवता येणार
By मोरेश्वर येरम | Published: December 13, 2020 01:46 PM2020-12-13T13:46:03+5:302020-12-13T13:49:36+5:30
स्वदेशी आणि परदेशी स्रोतांचा वापर करुन विविध प्रकारचा सुसज्ज शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे. चीन आणि पाकिस्तानच्या आव्हानाचा विचार करुन सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
नवी दिल्ली
चीनच्या सीमेवरील कुरापती लक्षात घेता भारताने महत्वाचं पाऊल उचललं आहे. भारतीय सुरक्षा दलाला आता लढाईसाठी लागणारा १५ दिवसांचा युद्धसाठा करुन ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नव्या अधिकारांमुळे आणि आणीबाणीच्या काळातील खरेदीच्या अधिकारांचा वापर करुन येत्या काही महिन्यांमध्ये भारतीय लष्कर तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.
स्वदेशी आणि परदेशी स्रोतांचा वापर करुन विविध प्रकारचा सुसज्ज शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे. चीन आणि पाकिस्तानच्या आव्हानाचा विचार करुन सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
परकीय शक्तींकडून देशावर हल्ला झाल्यास १० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा तयार ठेवण्याची परवानगी सुरक्षा दलांना होती. त्यात वाढ करुन आता १५ दिवसांचा शस्त्रसाठा सुरक्षा दलाला ठेवता येणार आहे. "शत्रू देशासोबत लढाईचा प्रसंग उद्भवल्यास १५ दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा करण्याची परवानगी देण्यात आली असून त्यासाठी आवश्यक तो शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे", अशी माहिती सरकारी सुत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.
चीन आणि पाकिस्तानला एकत्रितरित्या सामोरं जाण्यासाठी भारताची तयारी
भारत सध्या चीनच्या सीमेवरील कुरापतींचा सामना करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानकडून सुरू असलेली घुसखोरीही भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. तिन्ही सेना दलांचे प्रमुख बिपिन रावत यांनीही याआधी अनेकदा चीन आणि पाकिस्तानसोबत एकत्रितरित्या तोंड द्यावं लागण्याची तयारी करायला हवी असं म्हटलं आहे. चीनसोबतच्या तणावामुळे भारताने अनेक सुरक्षा करार केले आहेत. याशिवाय अनेक स्वदेशी मिसाइलची चाचणी केली जात आहे.