1965 ते 71च्या युद्धानंतर लष्कर मजबूत, कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार- जेटली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 05:50 PM2017-08-09T17:50:36+5:302017-08-09T17:50:46+5:30

डोकलाम मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाला संरक्षण मंत्री अरुण जेटलींनी जोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Indian armed forces strong enough to meet any challenge, says Arun Jaitley | 1965 ते 71च्या युद्धानंतर लष्कर मजबूत, कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार- जेटली

1965 ते 71च्या युद्धानंतर लष्कर मजबूत, कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार- जेटली

नवी दिल्ली, दि. 9 - डोकलाम मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाला संरक्षण मंत्री अरुण जेटलींनी जोख प्रत्युत्तर दिलं आहे. जेटली राज्यसभेत म्हणाले, भारतीय लष्कर देशाच्या संरक्षणासाठी कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकते. 1962च्या युद्धातून आम्हाला चांगला अनुभव मिळाला आहे. गेल्या काही दशकात भारतानं अनेक आव्हानांचा सामना केला आहे.

1965  आणि 1971च्या युद्धामुळे भारताचं लष्कर आणखी ताकदवान झालं आहे. जेटली 1942च्या महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. आम्ही आजही शेजारील देशांच्या आव्हानाचा सामना करतोय. 1962च्या तुलनेत 1965 आणि 1971च्या युद्धामुळे भारतीय लष्कर मजबूत झालं आहे. 1962मध्ये भारताला चीनकडून लादण्यात आलेल्या युद्धाचा सामना करावा लागला होता. त्या युद्धात भारताचं मोठं नुकसान झालंय. परंतु 1965 आणि 1971मध्ये झालेल्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात भारतानं विजय मिळवला होता, याचीही जेटलींनी आठवण करून दिली आहे.

स्वातंत्र्याच्या नंतर लगेचच आपण काही अडचणींचा सामना केला. शेजारील राष्ट्राची नेहमीच काश्मीरवर नजर होती. आजही देशाचा एक भाग आमच्यापासून वेगळा झाल्याचं आम्ही विसरू शकत नाही. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात समाविष्ट करावा, अशी अनेक भारतीयांची इच्छा आहे. देशाला प्रत्येक हिंसेपासून मुक्त करणं गरजेचं आहे. देश दहशतवाद आणि नक्षलवादासारख्या मोठ्या आव्हानांचा सामना करतोय. राजीव गांधी आणि इंदिरा गांधींनी दहशतवादामुळेच स्वतःचा जीव गमावला आहे. सुरक्षा दलाचे जवान जम्मू-काश्मीरला दहशतवादापासून मुक्त करण्यासाठी मोठं योगदान देतायत, असंही जेटली म्हणाले आहेत. 

भारताने डोकलाममध्ये चिनी लष्कराला रस्ता बनवण्यापासून रोखल्याने हा वाद सुरु झाला होता. चीन बनवत असलेला रस्ता हा भारत, भूतान आणि चीनच्या संयुक्त सीमेवर आहे. भारताने येथील रस्त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. हा रस्ता बांधून पूर्ण झाल्यास या मार्गाच्या मदतीने चीनी सैन्य भारताचा पूर्वेकडील राज्यांशी असलेला संपर्क तोडू शकतो अशी भारताला भीती आहे.  

Web Title: Indian armed forces strong enough to meet any challenge, says Arun Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.