नेपाळ बॉर्डरमार्गे भारतात दहशतवाद्यांना पाठवतोय पाकिस्तान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 04:21 PM2019-05-15T16:21:31+5:302019-05-15T16:22:02+5:30
पुलवामा हल्ल्यानंतरही भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सीमेवर तणाव सुरूच आहे.
श्रीनगरः पुलवामा हल्ल्यानंतरही भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सीमेवर तणाव सुरूच आहे. भारतीय लष्करही घुसखोरांना रोखण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. अशातच पाकिस्तान दहशतवाद्यांना लागोपाठ भारतात घुसखोरी करण्यासाठी नवनव्या मार्गांचा वापर करत आहे. गुप्तचर विभागाच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान आता नेपाळ बॉर्डरमार्गे दहशतवाद्यांना भारतात पाठवत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तीन दहशतवादीनेपाळमार्गे भारतात घुसखोरी करण्यात यशस्वी ठरले आहेत.
घुसखोरी करून तिन्ही दहशतवादी उत्तर काश्मीरमधल्या बांदिपोरात दाखल झाले आहेत. त्या दहशतवाद्यांना बांदिपोऱ्यात पोहोचवण्यासाठी साजिद मीर ऊर्फ हैदर नावाच्या दहशतवाद्यानं मदत केली आहे. साजिद मीर ऊर्फ हैदर हा दहशतवादी सोपोरमध्ये सक्रिय आहे. साजिद आपल्या इतर साथीदारांबरोबर नेपाळच्या काठमांडूमध्ये दाखल झाला होता. तिकडून त्यानं तीन दहशतवाद्यांना बरोबर घेऊन बांदिपोरा गाठलं.
गेल्या दोन वर्षांत नेपाळमार्गे दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केल्याच्या घटना समोर आलेल्या नव्हत्या. या वर्षी पहिल्यांदाच नेपाळमार्गे दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याचा एक नवीन मार्ग सापडला आहे. एप्रिल महिन्यात पाकिस्ताननं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. तर दुसरीकडे सर्दीतून बर्फवृष्टी होत असताना दहशतवादी घुसखोरी करतात.