है तय्यार हम! चीनच्या सीमेवर हवाई दल, लष्कर पहिल्यांदाच करणार युद्धाभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 12:57 PM2019-09-11T12:57:08+5:302019-09-11T13:00:26+5:30
माऊंटन स्ट्राइक कोरचे 5 हजाराहून अधिक जवान सहभागी होणार
इटानगर: चीनला लागून असलेल्या भागात भारतीय सैन्य मोठा युद्धाभ्यास करणार आहे. माऊंटन स्ट्राइक कोरचे 5 हजाराहून अधिक जवान यामध्ये सहभागी होतील. ऑक्टोबर महिन्यात अरुणाचल प्रदेशात होणाऱ्या युद्धाभ्यासात हवाई दलाचाही सहभाग असेल. चीनच्या सीमावर्ती भागात भारतीय सैन्य पहिल्यांदाच युद्धाभ्यास करणार आहे.
लष्करातील एका वरिष्ठ सूत्रानं एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, युद्धाभ्यासासाठी तेजपूरमधील 4 कोरच्या जवानांना सीमावर्ती भागात पाठवण्यात येईल. याचवेळी 17 माऊंटन स्ट्राइक कोरच्या 2500 जवानांना हवाई दल एअरलिफ्ट करेल. युद्धाभ्यासादरम्यान स्ट्राइक कोरचे जवान 4 कोरच्या जवानांवर हवाई हल्ले करतील.
युद्धाभ्यासात हवाई दल सी-17, सी-130 सुपर हर्क्युलिस, एएन-32 विमानाचा वापर करेल. या विमानांमधून जवानांना एअरलिफ्ट केलं जाईल. ही विमानं बंगालच्या बागडोगरामधून जवानांना एअरलिफ्ट करतील. त्यानंतर या जवानांना अरुणाचल प्रदेशातील वॉर झोनमध्ये उतरवण्यात येईल. युद्धाभ्यास प्रभावी होण्यासाठी लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या देखरेखीखाली इंटिग्रेटेड बॅटल्स ग्रुप्स (आयबीजी) तयार केले जातील. आयबीजी शत्रूवर अतिशय वेगानं दूरवर हल्ले करतील.