काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई, 10 किलो IED बॉम्बसह 3 दहशतवाद्यांना अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 04:27 PM2023-05-31T16:27:58+5:302023-05-31T16:28:25+5:30
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या IED द्वारे पुंछमधील लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता
जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये लष्कराने मोठी कारवाई करत भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून प्रेशर कुकरमध्ये जिवंत बॉम्बही जप्त करण्यात आला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या IED द्वारे पुंछमधील लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. 10 किलोचा हा IED जेवण बनवणाऱ्या प्रेशर कुकरमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये तयार करून भारतात पाठवण्यात आला होता. कोणालाही संशय येऊ नये म्हणून प्रेशर कुकरमध्ये IED तयार करण्यात आला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने पकडलेले तिन्ही दहशतवादी स्थानिक असून एलओसीचे कुंपण ओलांडल्यानंतर 50 मीटर आत घुसून दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून शस्त्र, ड्रग्ज आणि IED घेऊन परत येत होते. दरम्यान, भारतीय लष्कराचे हे ऑपरेशन रात्री एक वाजण्याच्या सुमारास करण्यात आले.
लष्कराला पाकव्याप्त काश्मीरमधून काही हालचाली आढळल्या. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी प्रत्त्युतर दिले. यादरम्यान भारतीय जवान थोडक्यात बचावले. प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यात आली, ज्यात एक दहशतवादी जखमी झाला.
तिन्ही दहशतवाद्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडील 10 किलोचा IED बॉम्ब पाहून सर्वांना धक्का बसला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान असे समोर आले आहे की, हा बॉम्ब भारतीय लष्कराविरोधातच वापरायचा होता. या बॉम्बने पुंछमध्ये भारतीय लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. कुणाला संशय येऊ नये म्हणून बॉम्ब आणण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला.