"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 06:48 PM2024-10-01T18:48:23+5:302024-10-01T18:50:18+5:30
Army Chief on Lebanon pager attacks: लेबनानसारखा पेजर हल्ला भारतात करायचा प्रयत्न झाल्यास भारत किती सज्ज आहे, याबाबतही लष्करप्रमुखांनी सांगितले
Army Chief on Lebanon pager attacks: लेबनानमधील पेजर स्फोटावर भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी ( Upendra Dwivedi ) यांनी आज प्रतिक्रिया दिली. पेजर्स पुरवण्याच्या पद्धतीला त्यांनी 'इस्रायलचा मास्टरस्ट्रोक' म्हटले. याशिवाय अशा धमक्यांबाबत भारतीय यंत्रणा कितपत सज्ज आहे, याचीही माहिती त्यांनी दिली. लेबनानमधील पेजर स्फोटावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर भारतीय लष्करप्रमुख म्हणाले, तुम्ही ज्या पेजरबद्दल बोलत आहात, ते तैवानच्या कंपनीचे आहे. त्या पेजरचा पुरवठा एका हंगेरियन कंपनीकडून केला जात होता. त्याच्या पुरवठा करण्याच्या पद्धतीचा प्लॅन आणि त्यानंतर केलेला हल्ला हा एक मास्टरस्ट्रोक म्हणावा लागेल.
भारतीय लष्करप्रमुख जनरल द्विवेदी म्हणाले, "हंगेरीमध्ये बनवण्यात आलेल्या पेजरशी छेडछाड करणे हा इस्रायलचा मास्टरस्ट्रोक होता. हे करण्यासाठी तुम्हाला अनेक वर्षे नजर ठेवून तयारी करावी लागते. हा प्लॅन इस्रायलने नीट पार पाडला. यावरूनच हे स्पष्ट दिसून येते की इस्रायल यासाठी तयार होता. जेव्हा तुम्ही लढाईला सुरुवात करता तेव्हा ते युद्ध सुरू होते असा समज करून घेऊ नका. खरे युद्ध तेव्हाच सुरु झालेले असते जेव्हा तुम्ही त्यादृष्टीने नियोजन सुरू केलेले असते. युद्धाआधीचे नियोजन हा खूप महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे त्याकडे बारीक नजर हवी. हा भाग युद्धात सर्वात महत्त्वाचा असतो."
जनरल द्विवेदी यांनी या हल्ल्यासाठी इस्रायलच्या वर्षभराच्या तयारीचे कौतुक केले. तसेच, असे हल्ले काही दिवसांच्या ऑपरेशनने होत नाहीत, त्यासाठी दीर्घ तयारी आवश्यक असते असेही सांगितले.
पेजर हल्ल्यांसारख्या धोक्यासाठी भारत किती तयार आहे?
जनरल द्विवेदी भारताच्या तयारीबद्दल म्हणाले, “पुरवठा साखळीतील अडथळे आणि व्यत्यय अशा गोष्टी या हल्ल्यांसाठी कारणीभूत ठरतात. यासाठी आम्हाला खूप सावध राहावे लागते. वेगवेगळ्या पातळ्यांवर तपासण्या कराव्या लागतात. तांत्रिक असो किंवा मॅन्युअल असो, सर्वच स्तरावर तपासणी केल्यानंतर आम्ही त्या गोष्टींचा निर्णय घेतो. जेणेकरून आपल्या बाबतीत अशा गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही याची आम्ही खात्री करू शकू."
दरम्यान, इस्रायलने १७ आणि १८ सप्टेंबरला हिजबुल्लाह सैनिकांना लक्ष्य करून पेजरहल्ले घडवून आणले. दुसऱ्या दिवशी हिजबुल्लाहच्या सैनिकांच्या वॉकी-टॉकीचेही स्फोट घडवून आणण्यात आले. हजारो पेजर्स आणि वॉकी-टॉकी स्फोटांमुळे लहान मुलांसह किमान ३७ लोक ठार झाले आणि सुमारे ३ हजार लोक जखमी झाले.