भारतीय लष्करप्रमुखांच्या विधानाने चीनचा झाला तीळपापड! इशा-याची भाषा, जरा सांभाळून अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 06:37 PM2018-01-15T18:37:22+5:302018-01-15T19:07:07+5:30
भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या विधानावर सोमवारी चीनने तीव्र संताप व्यक्त केला. भारतीय लष्करप्रमुखांचे विधान पूर्णपणे अयोग्य असून त्यांच्या अशा प्रकारच्या विधानांमुळे सीमेवरील शांतता आणि स्थिरता धोक्यात येऊ शकते.
नवी दिल्ली - भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या विधानावर सोमवारी चीनने तीव्र संताप व्यक्त केला. भारतीय लष्करप्रमुखांचे विधान पूर्णपणे अयोग्य असून त्यांच्या अशा प्रकारच्या विधानांमुळे सीमेवरील शांतता आणि स्थिरता धोक्यात येऊ शकते असे चीनने म्हटले आहे. भारताने आता पाकिस्तानपेक्षा उत्तरेकडच्या चीनला लागून असणा-या सीमेवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. चीन जर बलवान असेल तर भारतही कमकुवत नाही असे विधान बिपिन रावत यांनी मागच्या आठवडयात केले होते.
मागच्या वर्षभरात भारत-चीन संबंधात अनेक नाटयमय कलाटणी देणारी वळणे आली आहेत असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितले. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारत-चीनच्या नेत्यांनी दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी मतभेदांचे मुद्दे सामंजस्याने हाताळण्याचा एकमताने निर्णय घेतला होता. अलीकडेच दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध सुधारण्यास सुरुवात झाली आहे. या परिस्थितीत भारताच्या वरिष्ठ अधिका-यांनी अशा प्रकारचे अयोग्य मतप्रदर्शन केल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंध सुधारण्याला खीळ बसू शकते असे लु कांग म्हणाले. यामुळे सीमा भागात शांतता आणि स्थिरता राहणार नाही.
काय म्हणाले होते बिपीन रावत
दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बिपीन रावत म्हणाले होते की, 'चीन एक शक्तिशाली देश आहे, पण आपणही दुबळे नाही आहोत'. चीनी घुसखोरीच्या एका प्रश्नावर बोलताना त्यांनी आम्ही कोणालाही आमच्या क्षेत्रात घुसखोरी करण्याची परवानगी देणार नसल्याचं सांगितलं. 'चीन सीमारेषेवर दबाव वाढवत आहे हे खरं आहे, पण आम्ही त्याचा सामना करत आहोत', असंही ते बोलले आहेत. 'चीनसोबत तणाव वाढू नये यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आम्ही लोक आपल्या जमिनीवर घुसखोरी होऊ देणार नाही. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर पुढील कारवाईसाठी लष्कराला योग्य ते आदेश देण्यात आले आहेत', असं बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं.