नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकिस्तानच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान, तीन बंकर उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 08:45 AM2018-04-24T08:45:51+5:302018-04-24T10:14:02+5:30
नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने आज मोठी कारवाई केली आहे. राजौरी आणि पुंछ परिसरात भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे तीन बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
श्रीनगर - नियंत्रण रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराने आज मोठी कारवाई केली आहे. राजौरी आणि पुंछ परिसरात भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे तीन बंकर उद्ध्वस्त करण्यात आले असून, पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले आहेत. तसेच गोळीबारामध्ये पाकिस्तानचे 20 जवान ठार झाल्याचेही वृत्त आहे.
भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील पुंछ परिसरातील मेंढर विभागात ही प्रत्युत्तरदाखल कारवाई केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून अकारण गोळीबार करण्यात येत होता. भारतीय लष्कराने या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तरदाखल कारवाईत पाकिस्तानचे फार नुकसान झाले. तसेच त्यांचे किमान पाच सैनिक ठार झाले.
भारतीय सैनिकांच्या कारवाईत पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त झाली आहे, तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील काही नागरिकही जखमी झाले आहेत. याआधी जानेवारी महिन्यात जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या दोन चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. त्या कारवाईत पाकिस्तानचे किमान 8 ते दहा रेंजर्सही ठार झाले होते.