ड्रॅगनची चलाखी हाणून पाडण्यासाठी भारत तयार; लडाखमध्ये 'खास' 15 हजार जवान तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 06:42 PM2021-07-24T18:42:34+5:302021-07-24T18:43:11+5:30
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात चीनने पूर्व लडाख भागात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. यानंतर अनेक महिने चाललेल्या चर्चेनंतर काही पॉइंट्सवर चीन सैन्य मागे हटले. मात्र, अजूनही काही पॉइंट्स असे आहेत, जेथे दोन्ही देशाचे सैन्य समोरा-समोर आहेत.
नवी दिल्ली - लडाखमध्ये चिनी आक्रमण हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कराने (Indian Army) दहशतवाद विरोधी अभियानातील आपले यूनिट्स जम्मू-काश्मिरातून पूर्व लडाख सेक्टरमध्ये ट्रान्सफर केले आहेत. 'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार त्यांना सूत्रांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, "जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद विरोधी युनिट्समधून जवळपास 15,000 जवानांना काही महिन्यांपूर्वीच लद्दाख भागात चिनी आक्रमणाचा सामना करण्यासाठी नेण्यात आले होते." लडाख भागात गेल्या काही दिवसांपासून लष्कर तैनात करण्यात आले आहे आणि हे जवान भविष्यात पीपल्स लिब्रेशन आर्मीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी लेहमधील 14 कोर मुख्यालयाची मदत करतील.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात चीनने पूर्व लडाख भागात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. यानंतर अनेक महिने चाललेल्या चर्चेनंतर काही पॉइंट्सवर चीन सैन्य मागे हटले. मात्र, अजूनही काही पॉइंट्स असे आहेत, जेथे दोन्ही देशाचे सैन्य समोरा-समोर आहेत. चीनची आक्रमकता पाहत भारतानेही मोठ्या प्रमाणावर येथे लष्कर आणि लष्करी साहित्य वाढविले आहे.
भारतीय लष्कराच्या 17 माउंटेन स्ट्राइक कोरला चीन सीमेवर कुठल्याही प्रकारच्या समस्येचा सामना करण्यासाठी 10,000 अतिरिक्त सैनिकांच्या रुपात एक मोठा बुस्ट मिळाला आहे. विशेष म्हणजे भारत आणि चीन यांच्यात गेल्या एक वर्षांपासून वाद वाढलेला असतानाच, 17 माउंटेन स्ट्राइक कोरची ताकद भारताने वाढवली आहे.
गेल्या वर्षापासूनच सीमेवर भारत आणि चीनचे सैन्य तैनात आहे. मथुरेतील वन स्ट्राइक कोरलाही उत्तरेकडील सीमेकडे करण्यात आले आहे. तसेच याचे एक फॉर्मेशन याथेच राहील. याशिवाय इतर भागातील फॉर्मेशन आणि सैनिकांची तैनातीही मजबूत करण्यात आली आहे.