ऐतिहासिक निर्णय! भारतीय लष्करात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल रँकवर केलं प्रमोट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 03:28 PM2021-08-23T15:28:18+5:302021-08-23T15:28:53+5:30
भारतीय लष्करात सेवा योग्यतेनुसार २६ वर्ष पूर्ण केलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांचे कर्नल रँकवर प्रमोशन होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
भारतीय लष्करात सेवा योग्यतेनुसार २६ वर्ष पूर्ण केलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांचे कर्नल रँकवर प्रमोशन होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कोअर ऑफ सिग्नल, कोअर ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड मॅकेनिकल इंजिनिअर आणि कोअर ऑफ इंजिनिअर्समध्ये नियुक्त असलेल्या महिला अधिकाऱ्यांना कर्नल रँक मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. याआधी आर्मी मेडिकल कोअर, जज अॅडवोकेट जनरल आणि सैन्य प्रशिक्षण कोअर याच विभागातील महिला अधिकाऱ्यांना कर्नल रँकपर्यंत प्रमोशन दिलं जात होतं.
भारतीय लष्करात विविध विभागांमध्ये महिला अधिकाऱ्यांच्या प्रमोशनचा मार्ग खुला होणं हे लष्करी क्षेत्रातील करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी मोठ्या संधीचे संकेत आहेत. भारतीय लष्कराच्या बहुतांश विभागांमध्ये महिला अधिकाऱ्यांना स्थायी स्वरुपात हुद्दा होण्याच्या निर्णयासोबतच आणखी काही महत्वाचे निर्णय येत्या काळात घेतले जाऊ शकतात.
या आहेत पाच महिला अधिकारी
कर्नल टाइम स्केल रँकसाठी निवड करण्यात आलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांमध्ये कोअर ऑफ सिग्नलच्या लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना, ईएमई कोअरच्या लेफ्टनंट कर्नल सोनिया आनंद आणि कर्नल नवनीत दुग्गल. यासोबतच कोअर ऑफ इंजिनिअर्सच्या लेफ्टनंट कर्नल रीनू खन्ना व कर्नल रिचा सागर यांचा समावेश आहे.