अमेरिकेच्या सैन्यासारखं भारतीय सैनिकांनाही मिळणार 'खास हेल्मेट'; रात्रीच्या मोहिमांसाठी ठरणार उपयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 07:04 PM2021-07-12T19:04:29+5:302021-07-12T19:05:16+5:30
संरक्षण मंत्रालयानं भारतीय लष्करातील जवानांसाठी ५५६ ऑगमेंटेड रिआलिटी हेड माऊंटेड डिस्प्ले ((Augmented Reality Head Mounted Display) सिस्टम खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
संरक्षण मंत्रालयानं भारतीय लष्करातील जवानांसाठी ५५६ ऑगमेंटेड रिआलिटी हेड माऊंटेड डिस्प्ले ((Augmented Reality Head Mounted Display) सिस्टम खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अत्याधुनिक हेल्मेटच्या माध्यमातून खांद्यावरुन लाँच केल्या जाणाऱ्या मिसाइल सिस्टम आणि ZU सिस्टमसारख्या लँड बेस्ड एअर डिफेंस सिस्टमची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याशिवाय रात्री होणाऱ्या दहशतवाद विरोधी मोहिमांमध्येही भारतीय सैनिकांना या हेल्मेटनं मोठा फायदा होणार आहे. ( Indian Army to get 556 ARHMD systems know all about it)
खास पद्धतीनं डिझाइन करण्यात आलेल्या या हेल्मेटच्या माध्यमातून जवानांना रडार आणि थर्मल इमॅजिंक फोटोज मिळणार आहेत. याचा वापर करुन रात्रीच्या अंधारात जवानांना कोणत्याही वेळी आणि कोणत्याही मोसमात शत्रुवर हल्ला चढवता येणार आहे किंवा शत्रुचा अचूक वेध घेता येणार आहे. लवकरच या अत्याधुनिक हेल्मेटची खरेदी भारतीय संरक्षण विभागाकडून केली जाणार आहे.
नेमकी काय असते हेड माऊंटेड सिस्टम?
हेड माऊंटेड डिस्प्ले म्हणजे एक डिस्प्ले डिव्हाइस असतं. हे हेल्मेटसारखं डोक्यावर परिधान करता येतं. याच्या समोरच्या बाजूस एक छोटासा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यापद्धतीनं गेमिंग स्टेशन, एव्हिएशन इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण असतं. त्याचपद्धतीनं सैन्यातील जवानांसाठीचं हेल्मेट डिझाइन तयार करण्यात आलं आहे. अमेरिकेच्या सैन्याकडून या डिव्हाइसचा याआधीच वापर केला जात आहे. आता भारतीय सैनिक देखील लवकरच याचा वापर करणार आहेत.