Indian Army Iftar Party: भारतीय सैन्याने केले इफ्तार पार्टीचे आयोजन, फोटो शेअर करताच नेटकरी संतापले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 08:34 AM2022-04-24T08:34:48+5:302022-04-24T08:35:24+5:30
Indian Army Iftar Party in Doda: इंडियन आर्मीने इफ्तार पार्टीचे आयोजन करुन यासंदर्भात काही फोटो शेअर केले होते, पण नेटीझन्सचा संताप पाहून नंतर ते फोटो डिलीट करावे लागले.
Indian Army Iftar Party in Doda: भारतीय सैन्याला इफ्तार पार्टीशी संबंधित एका ट्विटमुळे नेटकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. सैन्याने जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी 'इफ्तार' पार्टीचे आयोजन केले होते. लष्कराने ट्विट करून या संदर्भात माहिती दिली, पण याचे फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. यानंतर लष्कराला ते ट्विट डिलीट करावे लागले.
दोडामध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन
लष्कराच्या जम्मू क्षेत्राच्या पीआरओने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'धर्मनिरपेक्षतेची परंपरा जिवंत ठेवत भारतीय लष्कराने डोडा जिल्ह्यातील अर्नोरा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.' ट्विटसोबत 4 फोटोही टाकण्यात आली, ज्यामध्ये लष्कराचे जवान आणि सामान्य लोक एकत्र उपवास सोडताना दिसत होते. हे ट्विट आल्यानंतर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला. एका यूजरने ट्विट करून लिहिले की, 'आता हा आजार लष्करातही दाखल झाला. दुःखद.'
सोशल मीडियावर ट्रोल
हे ट्विट 21 एप्रिल रोजी करण्यात आले होते. लष्कराच्या या ट्विटला धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात वर्णन करत अनेकांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर लष्कराने काही तासांनंतर हे ट्विट काढून टाकले. दरम्यान, लष्कराच्या प्रवक्त्याने ट्विट हटवण्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, एका लष्करी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जनतेशी मजबूत संबंध निर्माण करण्यासाठी इफ्तार पार्ट्या नियमितपणे आयोजित केल्या जातात. यावेळीही जम्मू-काश्मीरमध्ये परंपरेनुसार अशी पार्टी आयोजित करण्यात आली होती.