मणिपूरमध्ये जमावाने जवानाचे घर जाळले; शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न, दोन ठिकाणी गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 08:48 AM2023-07-06T08:48:28+5:302023-07-06T08:48:46+5:30
सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत २७ वर्षीय रोनाल्डो या व्यक्तीचा मृत्यू झाला.
इंफाळ : मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात संतप्त जमावाने भारतीय राखीव दलाच्या (आयआरबी) जवानाचे घर जाळले, तसेच शस्त्रे लुटण्याचा
प्रयत्न केला. २ ठिकाणी गोळीबार करण्यात आला. जवानाचे घर जाळण्यापूर्वी मंगळवारी रात्री समाराम येथे ७००-८०० लोकांच्या जमावाने चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वांगबल येथील भारतीय राखीव दलाच्या कॅम्पमधून शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला.
परिणामी, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत २७ वर्षीय रोनाल्डो या व्यक्तीचा मृत्यू झाला. आसाम रायफल्सच्या एका दलावरही जमावाने हल्ला केला. त्यांनी आसाम रायफल्सच्या जवानांवर गोळीबार केला आणि त्यांचे वाहन पेटवून दिले, त्यात एका जवानाच्या पायात गोळी लागली. या चकमकीत इतर १० जण जखमी झाले.
माकपा, भाकपाचे शिष्टमंडळ मणिपूरला जाणार
माकपा, भाकपा यांचे संयुक्त शिष्टमंडळ ६ ते ८ जुलै दरम्यान हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दोन्ही पक्षांनी मणिपूरला भेट देण्यासाठी पाच सदस्यीय पथकाची घोषणा केली. यामध्ये माकपचे राज्यसभा सदस्य विकास रंजन भट्टाचार्य, जॉन ब्रिटास आणि भाकपाचे खा. विनय विश्वम, संतोष कुमार पी. आणि के. सुब्बा रायन यांचा समावेश आहे.
हिंसेची जेपीसी चौकशी करा : काँग्रेस
केरळ काँग्रेस (एम) प्रमुख आणि राज्यसभा सदस्य जोस के. मणी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची मागणी केली आहे. संसदेच्या पुढील अधिवेशनात या विषयावर चर्चा व्हावी, असे ते म्हणाले. मणिपूरमध्ये जे काही घडले ते केवळ लोकांमधील दंगल नाही तर देशाच्या फाळणीच्या वेळी झालेल्या ‘नियोजित नरसंहार’प्रमाणेच आहे, असा दावा त्यांनी केला.
फुटबॉलपटूमुळे वाद राष्ट्रीय फुटबॉल संघाचा
मणिपूरचा खेळाडू जॅक्सन सिंगने कुवेतविरुद्धच्या सैफ चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयानंतर वैयक्तिक पदक घेताना मैतेई ध्वज ओढून घेतल्याने वाद निर्माण झाला आहे.फिफा २०१७ अंडर १७ विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा पहिला भारतीय डिफेन्सिव्ह मिडफिल्डर जॅक्सनने म्हटले की कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.