आर्मी मेजरची आत्महत्या, सर्व्हिस रायफलने स्वतःवर झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 05:51 PM2021-12-12T17:51:51+5:302021-12-12T17:52:04+5:30
दिल्लीचे रहिवासी असलेले मेजर परविंदर सिंग यांनी बनिहालच्या खारी भागातील निवासी क्वार्टरमध्ये स्वतःच्या सर्व्हिस रायफलने गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या लष्कराच्या एका मेजर रँकच्या अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री आपल्या निवासी क्वार्टरमध्ये या अधिकाऱ्याने स्वतःच्या सर्विस रायफलने कथितरित्या स्वतःवर गोळी झाडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील एका छावणीत 29 वर्षीय आर्मी मेजरने कथितरित्या आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दिल्लीचे रहिवासी मेजर परविंदर सिंग शनिवारी रात्री बनिहालच्या खारी भागातील माहुबल येथे कॅम्पच्या आत त्यांच्या निवासी क्वार्टरमध्ये होते.
यावेळी अचानक एक गोळी झाडलेला आवाज आला, इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता मेजर मेजर परविंदर सिंह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रविवारी रविवारी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती मीडियाला दिली. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, हे अधिकारी नुकतेच कंपनी कमांडर म्हणून कॅम्पमध्ये रुजू झाले होते. हे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण समजू शकले नाही. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अवंतीपोरामध्ये चकमक, एक दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. काश्मीर पोलिसांनी याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अवंतीपोराच्या बारागाम भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर पोलीस आणि लष्कर तिथे पोहोचले. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलांनी चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा केला.
तीन दहशतवाद्यांचा खात्मा
त्यापूर्वी 8 डिसेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. शोपियांच्या चक-ए-चोलन गावात दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध आणि घेराबंदी मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर प्रत्युत्तरात गोळीबार करण्यात आला. दोन्ही बाजूंनी दिवसभर चाललेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. काश्मीर पोलिसांनी सांगितल्यानुसार, अमीर हुसैन, रईस अहमद आणि हसीब युसूफ अशी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.