पुलवामामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ धुमश्चक्री, आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 05:31 PM2021-07-02T17:31:53+5:302021-07-02T17:33:18+5:30
Pulwama encounter: दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी पुलवामा जिल्ह्यातील राजपुराच्या हाजिन गावाला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली होती.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ धुमश्चक्री सुरू आहे. भारतीय लष्कराने (Indian Army) दहशतवाद्यांविरोधात केलेल्या या धडाकेबाज कारवाईत आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. (Pulwama encounter) तर या चकमकीदरम्यान, भारतीय लष्कराच्या एका जवानालाही वीरमरण आले आहे. दरम्यान, ही चकमक अद्यापही सुरू असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे. (Indian Army neutralised five militants in Pulwama encounter)
काश्मीर पोलिसांचे महानिरीक्षक (आयजी) विजय कुमार यांनी या चकमकीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले आहे. तर लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा जिल्हा कमांडर निशाज लोन आमि एक पाकिस्तानी दहशतवादी पुलवामामध्ये सुरू असलेल्या चकमकीत मारले गेले आहेत. या चकमकीमध्ये एकूण ५ दहशतवादी मारले गेले आहेत.
#UPDATE: Five Lashkar-e-Taiba terrorists, including district commander, and Army jawan killed in encounter in Jammu and Kashmir's Pulwama district, says police
— Press Trust of India (@PTI_News) July 2, 2021
दरम्यान, पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी पुलवामा जिल्ह्यातील राजपुराच्या हाजिन गावाला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळ्या झाडल्याने चकमक सुरू झाली. त्यानंतर दहशतवाद्यांच्या गोळीबाराला लष्कराच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.
चकमकीच्या सुरुवातीला झालेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला होता. त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळावर अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला. या चकमकीत सुरुवातीला तीन दहशतवादी मारले गेले. त्यांचा संबंध लष्क ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी होता.