पाकिस्तानी सैन्याच्या माऱ्यात भारतीय लष्कराचा एक अधिकारी शहीद, आठवडाभरातील दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 04:04 AM2020-09-03T04:04:52+5:302020-09-03T04:05:14+5:30
पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेवरील कलसियान, खांगेर, भवानी या भागातील भारतीय लष्कराच्या चौक्यांवर मारा केला.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील राजौरी क्षेत्रातील केरी भागामध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी बुधवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन मारा केला. त्यामध्ये भारतीय लष्कराचे राजेशकुमार हे अधिकारी शहीद झाले. या आठवडाभरात पाकिस्तानच्या माºयामध्ये भारतीय लष्करी अधिकारी शहीद होण्याची ही दुसरी घटना आहे.
पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेवरील कलसियान, खांगेर, भवानी या भागातील भारतीय लष्कराच्या चौक्यांवर मारा केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या राजेशकुमार या लष्करी अधिकाºयाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. राजेशकुमार भारतीय लष्करात ज्युनिअर कमिशन्ड आॅफिसर (जेसीओ) पदावर कार्यरत होते.
याआधी पाकिस्तानी सैनिकांनी ३० आॅगस्ट रोजी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यालगतच्या नियंत्रण रेषेवर मारा केला होता. त्यामध्ये भारतीय लष्करातील एक अधिकारी शहीद झाले होते. त्यानंतर तीन दिवसांनी पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचा भंग करत भारतीय हद्दीत मारा केला. यावेळी त्यांनी राजौरी क्षेत्रातील चौक्यांना लक्ष केले. गेल्या वर्षभरात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय हद्दीत गोळीबार किंवा उखळी तोफांचा मारा करण्याचे काही प्रकार घडले आहेत असे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने रद्द केले. तसेच जम्मू-काश्मीरपासून लडाख वेगळा केला. जम्मू-काश्मीर व लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला.
भारताच्या या कृतीचा राग आलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप कांगावा केला पण त्याला प्रमुख देशांनी भीक घातली नाही.
भारताविरोधात कुरापती सुरूच
काश्मिरी लोकांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत असा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे इम्रान खान सरकार सतत भारताच्या कुरापती काढत असते. काश्मीर सीमेवर पाकिस्तानी लष्कर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय हद्दीत मारा करत असल्याचे घडणारे प्रकार हा त्याचाच भाग आहे.