रक्त सांडवण्यास आलेल्या दहशतवाद्याचे जवानांनी रक्त देऊन वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 06:13 AM2022-08-26T06:13:58+5:302022-08-26T06:14:41+5:30
भारतीय लष्कराचे मानवतेचे आगळेवेगळे उदाहरण जगासमोर
श्रीनगर :
जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात जखमी झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला रक्त देऊन भारतीय जवानांनी त्याचे प्राण वाचवले. आपले रक्त सांडण्यासाठी आलेल्याला रक्त देऊन भारतीय लष्कराने मानवतेचे आगळेवेगळे उदाहरण जगासमोर ठेवले आहे.
जवानांनी त्याला दहशतवादी नाही, तर एक मानव समजून त्याचे प्राण वाचवले. त्याला अन्य रुग्णांप्रमाणेच वागवण्यात आले. तो ज्यांचे रक्त सांडण्यासाठी आला होता, त्यांनीच त्याला रक्त दिले, हा भारतीय लष्कराचा मोठेपणा आहे, असे राजौरी येथील लष्करी रुग्णालयाचे कमांडंट ब्रिगेडियर राजीव नायर म्हणाले.
२१ ऑगस्ट रोजी नौशेराच्या झांगर सेक्टरमध्ये भारतीय जवानांना तीन दहशतवादी दिसले. त्यांतील एकजण नियंत्रण रेषेलगतच्या भारतीय चौकीजवळ येऊन संरक्षक तार तोडण्याचा प्रयत्न करीत होता. जवानांनी आव्हान दिल्यानंतर दहशतवाद्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गोळीबारानंतर एकाला जिवंत पकडण्यात आले; तर अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. गोळी लागून हा दहशतवादी जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी राजौरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे लेफ्टनंट कर्नल देवेंद्र यादव यांनी सांगितले.
हाताने जेवणही भरवले...
हुसैनचा खूप रक्तस्राव झाला होता. तो जीवन-मरणाच्या सीमेवर होता. भारतीय जवानांनी रक्त देऊन त्याचे प्राण वाचवले. एवढेच नाहीतर त्याला आपल्या हाताने जेवण भरवलेे, असे ब्रिगेडियर राणा म्हणाले. मी मरण्यासाठी आलो होतो, मला धोका देण्यात आला. बंधू, मला येथून बाहेर काढा, असे हुसैन अटकेवेळी ओरडत होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हल्ल्याचा पूर्ण प्लॅन ठरला होता
त्याने अन्य दहशतवाद्यांसोबत मिळून भारताच्या सीमावर्ती चौक्यांची दोन ते तीनवेळा रेकी केली होती व ते योग्य वेळी हल्ला करण्यासाठी टपून होते. कर्नल चौधरी यांनी त्यांना २१ ऑगस्ट रोजी ठरवून दिलेल्या भारतीय चौक्यांवर हल्ला करण्यास सांगितले होते, असे हुसैनने चौकशीत कबूल केल्याचे ब्रिगेडियर कपिल राणा यांनी सांगितले.
पाक कर्नलने दिले ३० हजार रुपये
चौकशीदरम्यान जखमी दहशतवाद्याने गुन्हा कबूल केला. त्याने त्याचे नाव तबारक हुसैन असल्याचे आणि तो पाकव्याप्त काश्मीरातील सब्जकोट गावचा रहिवासी असल्याचे सांगितले. पाकिस्तानचे कर्नल युनूस चौधरी यांनी त्याला भारतीय चौक्यांवर हल्ला करण्यासाठी ३० हजार पाकिस्तानी रुपये दिले होते, असे तो म्हणाला.
मला बाकीच्या दहशतवाद्यांनी धोका दिला. त्यामुळे मी पकडला गेलो. माझे सहा महिन्यांचे प्रशिक्षण झाले असून, पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा व जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनांच्या अनेक शिबिरांत मी गेलेलो आहे.
- हुसैन