दहशतवादग्रस्तांसाठी भारतीय लष्कराच्या शाळा
By admin | Published: April 6, 2016 10:15 PM2016-04-06T22:15:12+5:302016-04-06T22:15:12+5:30
सीमेपलिकडील अतिरेक्यांना स्थानिकांची सहानुभूती मिळू नये, ते सदैव भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडलेले राहावेत, यासाठी जम्मू- काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराला विशेष प्रयत्न करावे लागतात
संकेत सातोपे, जम्मू
सीमेपलिकडील अतिरेक्यांना स्थानिकांची सहानुभूती मिळू नये, ते सदैव भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडलेले राहावेत, यासाठी जम्मू- काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराला विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे येथील अनेक नागरी समस्या सोडविण्यात लष्कर अग्रभागी आहे. येथील दहशतवादग्रस्तांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जम्मूमधील भारतीय लष्कराच्या १६ कॉर्पच्या माध्यमातून तब्बल आठ शाळा चालविण्यात येत आहेत. सेवाभावी प्रकल्पांवर १६ कॉर्प वर्षाकाठी तब्बल ९ कोटी रु पये खर्च करत असल्याची माहिती जम्मूच्या दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्रातील पत्रकारांना १६ कॉर्पचे प्रमुख कमांडिंग अधिकारी लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर यांनी दिली.
पुँछ जिल्ह्यातील सुरणकोट! काही वर्षांपूर्वी हा भाग अतिरेक्याचा तळ होता. अतिरेक्यांनी येथील अनेक लोकांच्या हत्या केल्या, अनेकांच्या मालमत्तांची धुळधाण केली. लष्करी कारवायांनंतर येथील भागात आता शांतता नांदत आहे. परंतु आता येथे मोठे आव्हान आहे ते अतिरेकी कारवायांना बळी पडलेल्यांच्या पूनर्वसनाचे. त्यासाठीच लष्कराने अतिरेकी कारवायांतील पीडितांच्या मुलांसाठी पोथा येथे २००१ साली आर्मी गुडविल स्कूलची स्थापना केली आहे. ना नफा ना तोटा तत्त्वावर ही शाळा चालविण्यात येते. ५०० ते ६०० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात.
हमीरपूर येथील पाइनवूड स्कूल हीसुद्धा अशाच प्रकारची लष्कराकडून चालविण्यात येणारी शाळा आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळाबारीला बळी पडलेल्यांच्या मुलांसाठी अगदी एलओसीच्या जवळच १९९६ साली ही शाळा स्थापन करण्यात आली आहे. येथील काही शिक्षकांनी याच शाळेत शिक्षण घेऊन आता येथेच नोकरी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांना रोजगारही उपलब्ध झाला आहे आणि विद्यार्थ्यांची सोयसुद्धा झाली आहे.
> इंग्रजी माध्यमातून अत्यंत कमी पैशात शिक्षण मिळत असल्यामुळे आता पालकांचाही या शाळेकडे ओढा आहे. परंतु, सुरूवातीच्या काळात मात्र विद्यार्थीच काय शिक्षकही शाळेत येण्यास घाबरत होते.
लष्कराच्या शाळेत शिकवल्यामुळे आपण अतिरेक्यांचा रोष ओढावून घेऊ अशी त्यांची भीती होती, परंतु अखेर लष्कराने त्यांचा विश्वास संपादन केला.
सीमा बाली या इंग्रजी विषयाच्या शिक्षिकेने म्हटले की, येथे मुख्यत: पहाडी भाषिक विद्यार्थी असल्यामुळे त्यांना इंग्रजी भाषेत अवगत करणे थोडे अवघड काम आहे, मात्र आम्ही त्यांच्या इंग्रजी शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करतो.