Indian Army: पाक, चीन नाही! भारतीय सैन्याच्या शस्त्र भांडाराला देशातूनच धोका; अतिक्रमणांनी वेढले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 06:56 PM2022-04-21T18:56:34+5:302022-04-21T18:57:26+5:30
एम्युनिशन डंप किंवा डेपोमध्ये सैन्याच्या गरजेनुसार गोळ्या, ग्रेनेड,बॉम्ब, माईन्स, रॉकेट आणि मिसाईल असतात. तसेच हे डेपो गरजेच्यावेळी वेगाने पुरवठा व्हावा यासाठी उभारलेले असतात.
गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या शस्त्रास्त्रांच्या साठ्याला भीषण आग लागली होती. असाच धोका भारतीय सैन्याच्या शस्त्र भांडाराला उद्भवण्याची शक्यता आहे. शस्त्रास्त्रांच्या डेपोच्या आजुबाजुला पूर्वी घरे बांधली जात नव्हती. परंतू आता कोणाचाच धरबंध नसल्याने सर्रास अनधिकृत घरे, इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. यामुळे या शस्त्रांच्या साठ्याला देशातच धोका निर्माण झाला आहे.
भारतीय सैन्याच्या अनेक एम्युनेशन डंपजवळ आता अनधिकृत वसाहती उभ्या राहू लागल्या आहेत. यामुळे चिता वाढली आहे. भारतीय सैन्य हा प्रश्न मांडत आहे, परंतू त्यांना स्थानिक यंत्रणांची मदत मिळत नाहीय. अनेक ठिकाणी द वर्क्स ऑफ डिफेंस एक्टचे पालन होत नाहीय, अशी सैन्याची तक्रार आहे.
एम्युनिशन डंप किंवा डेपोमध्ये सैन्याच्या गरजेनुसार गोळ्या, ग्रेनेड,बॉम्ब, माईन्स, रॉकेट आणि मिसाईल असतात. तसेच हे डेपो गरजेच्यावेळी वेगाने पुरवठा व्हावा यासाठी उभारलेले असतात. स्फोटके असल्याने हे डेपो शहरांच्या एका बाजुला लोकसंख्येपासून दूर उभारण्यात आले आहेत. परंतू आता शहरे वाढू लागली असून ही लोकसंख्या आता या डेपोंच्या वेशीवर येऊन ठेपली आहे.
भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षेचा विचार करून वर्क्स ऑफ डिफेन्स कायदा 1903 मध्ये लागू करण्यात आला होता. ज्यानुसार क्रिटिकल डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट (महत्त्वाचे संरक्षण आस्थापना) च्या आजूबाजूच्या जमिनीच्या वापरावर काही निर्बंध आहेत, परवानगीशिवाय तेथे बांधकाम करता येत नाही. या कायद्यांतर्गत तीन झोन आहेत. अ वर्ग झोनमध्ये 2000 यार्डपर्यंत परवानगीशिवाय जमिनीच्या वर कोणतेही बांधकाम करता येणार नाही. ब वर्ग झोनमध्ये 1000 यार्डपर्यंत परवानगीशिवाय बांधकाम किंवा झाडे लावता येणार नाहीत. क वर्ग झोनमध्ये 500 यार्डांपर्यंत परवानगीशिवाय जमिनीच्या वर किंवा खाली कुठेही बांधकाम करता येणार नाही.
परंतू एम्युनिशन डंप बडोवाल (लुधियाना), एम्युनिशन डंप वाला (अमृतसर), एम्युनिशन डंप पुलगाव (महाराष्ट्र), एम्युनिशन डंप भटिंडा या ठिकाणी नियमांचे सर्वाधिक उल्लंघन झाले आहे. अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण झाले आहे. यापैकी अनेक प्रकरणे न्यायालयात पेंडिंग आहेत. यामुळे सैन्यासह नागरिकांनाही य़ापासून धोका आहे. 2016 मध्ये, पुलगाव येथील दारूगोळा डेपोला भीषण आग लागली, ज्यात 11 जवान शहीद झाले होते. 2010 मध्ये पानागढच्या डेपोमध्ये आग लागली आणि त्यानंतर अनेक स्फोट झाले होते.