लडाखमध्ये भारतीय लष्कर दीर्घकाळपर्यंत राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 11:49 PM2020-08-01T23:49:19+5:302020-08-01T23:49:31+5:30
भारताच्या एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, स्थितीचा आढावा घेऊन आम्ही एलएसीवरील लष्कराबाबत निर्णय घेऊ.
नवी दिल्ली : लडाखमधील भारतीय लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या दीर्घकाळपर्यंत राहतील, असे संकेत मिळत आहेत. भारताच्या एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, स्थितीचा आढावा घेऊन आम्ही एलएसीवरील लष्कराबाबत निर्णय घेऊ. चीनचे राजदूत सन विडाँग यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते की, ‘बहुतांश ठिकाणी माघार घेतली गेली आहे. तथापि, पॅट्रोलिंग पॉइंट १७ ए आणि पँगोंग त्सो येथे माघार घेतली गेली नसल्याचा दावा भारताकडून करण्यात आला आहे.’ विडाँग यांच्या वक्तव्यातून वाद मिटलेला नसल्याचे, तसेच भारताचे सैन्य वाद पूर्णत: मिटेपर्यंत सीमेवर राहणार असल्याचे संकेत मिळतात.
लिपुलेखमध्ये चीनची बटालियन
उत्तराखंड सीमेवरील लिपुलेख खिंडीजवळ चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची एक बटालियन दाखल झाल्याचे वृत्त आहे. या भागात काही आठवड्यांपासून चिनी सैनिकांच्या हालचाली दिसून येत होत्या. याशिवाय उत्तर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश सीमेवरही चिनी सैनिकांची वर्दळ वाढली आहे, असे एका लष्करी कमांडरने सांगितले.