भारतीय बँकांमध्ये दर तासाला एक गैरव्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 08:49 AM2018-04-04T08:49:55+5:302018-04-04T08:49:55+5:30
अहवालातून धक्कादायक माहिती समोर
गेल्या काही दिवसांमध्ये बँकांमधील अनेक घोटाळे उघडकीस आले. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विक्रम कोठारी यांनी केलेली बँकांची फसवणूक गेल्या काही दिवसांमध्ये उजेडात आले. त्यामुळे बँकांमध्ये होणारे गैरव्यवहार एकापाठोपाठ समोर आले. बँकांमध्ये होणाऱ्या याच गैरव्यवहारांबद्दलचा एक अहवाल आता प्रसिद्ध झाला आहे. 2016 ते 2017 या आर्थिक वर्षात भारतीय बँकांमध्ये तब्बल 12,533 गैरव्यवहार घडल्याची आकडेवारी या अहवालातून समोर आली आहे. याची सरासरी काढल्यास भारतीय बँकांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात दर तासाला एक घोटाळा झाला आहे.
इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर अॅडव्हायझरी सर्व्हिसेसच्या अहवालातील आकडेवारीनुसार एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत भारतीय बँकांमध्ये 12,533 गैरव्यवहार झाले. यामुळे बँकांचे 18 हजार 170 कोटी रुपयांचे नुकसान झाले. अहवालातील आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक गैरव्यवहार बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये झाले. हा आकडा 3,893 इतका आहे. तर यानंतर आयसीआयसीआय (3,359) आणि एचडीएफसी (2,319) यांचा क्रमांक लागतो.
एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत झालेल्या गैरव्यवहारांमुळे सर्वाधिक नुकसान पंजाब नॅशनल बँकेचे झाले आहे. पंजाब नॅशनल बँकेला गेल्या आर्थिक वर्षात गैरव्यवहारांमुळे 2,810 कोटींचा फटका बसला आहे. पंजाब नॅशनल बँकेपाठोपाठ बँक ऑफ इंडिया (2,770 कोटी रुपये) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (2,420 कोटी रुपये) यांचा क्रमांक लागतो. 'व्यवस्थापन आणि कर्जदार यांच्यातील संगनमत, त्याकडे नियंत्रकाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे बँकांमध्ये गैरव्यवहार होतात,' असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रबर्ती यांनी म्हटले.