भारतीय व्यापारी चीनला झटका देण्याच्या तयारीत; १ लाख कोटींपर्यंतची आयात होणार कमी
By जयदीप दाभोळकर | Published: January 6, 2021 03:43 PM2021-01-06T15:43:14+5:302021-01-06T15:48:27+5:30
गेल्या वर्षीही चिनी वस्तूंवरील बंदीचा चीनला बसला होता मोठा फटका
भारतचीन सीमेवरील तणाव हा चीनला भारी पडणार आहे. चीनहून भारतात केली जाणारी आयात सुरू वर्षामध्ये १ लाख कोटी रूपयांनी कमी करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघानं (कॅट) मुंबई महानगर प्रदेशाच्या नववर्षाच्या बैठकीत यावर चर्चा केली. कॅट ही देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना आहे.
संघटनेशी निगडीत असलेल्या देशभरातील ५ कोटी व्यापाऱ्यांनी २०२० हे वर्ष आत्मसन्मानाच्या रूपात पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत चिनी सामानावर बहिष्कार टाकणं आणि भारतीय वस्तूंच्या विक्रीचा सर्वाधिक प्रयत्न केला होता. ही मोहीम मुंबई महानगर प्रदेशात अधिक व्यापक करण्याचा निर्णय यापूर्वीच्या बैठकीत घेण्यात आला होता.
"मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. यामुळे मुंबईत ग्राहकांकडून येणारी मागणी जास्त आहे. अशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचा मुंबईवर सर्वाधिक परिणाम होणार आहे," असं मत कॅट मुंबई महानगराचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितलं. २०२० या वर्षात कोरोनाचं संकट असल्यामुळे वर्षभर व्यापारात उत्साह नव्हता. परंतु नवरात्र आणि दिवाळीच्या कालावधीत मागणी वाढल्यानंतरही कॅटच्या सदस्यांनी चिनी मालावर बहिष्कार टाकला होता. ज्यामुळे चीनला ४० हजार कोटी रूपयांचा तोटा झाला होता. मुंबईतील हा आकडा ५.५ कोटी रूपये होता. परंतु यावर्षी १ लाख कोटी रूपयांची आयात कमी करण्याचा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे.