पाकमध्ये भारतीय चॅनल्स बंद
By admin | Published: October 2, 2016 12:46 AM2016-10-02T00:46:22+5:302016-10-02T00:46:22+5:30
भारतीय चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानने सर्व भारतीय टीव्ही चॅनल्सवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारतीय
नवी दिल्ली/इस्लामाबाद : भारतीय चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानने सर्व भारतीय टीव्ही चॅनल्सवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारतीय चॅनल्सवरील आणि पाकिस्तानात लोकप्रिय असलेले कार्यक्रम तेथील जनेतला पाहायला मिळणार नाहीत. तसेच भारतीय वृत्तवाहिन्यांवरील बातम्याही त्यांना समजू शकणार नाहीत.
या आदेशचे १५ आॅक्टोबरपासून पालन न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराच पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी आॅथॉरिटीने दिली आहे. ही बंदी १५ आॅक्टोबरपासून लागू होणार अससा यातून अर्थ निघत असला तरी संबंधित कंपन्यांशी असलेली कंत्राटे रद्द करण्यासाठी ही मुदत दिली असल्याचे सांगण्यात आले. परिणामी काही चॅनल्स १५ आॅक्टोबरच्या आधी बंद होतील.
याशिवाय भारतीय चित्रपटांवर संपूर्ण पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. वितरकांनी स्वत:हून ही बंदी घातली असे सांगण्यात येत असले तरी भारतीय चित्रपट दाखविल्यास चित्रपटगृहांची नासधूस होईल, अशी भीती त्यांना आहे. महेंद्रसिंग ढोणी यांच्यावरील चित्रपट शुक्रवारी पाकिस्तानातील एकाही शहरात प्रदर्शित करण्यात आला नाही. दोन देशांतील तणाव लक्षात घेता, आम्ही स्वत:हून हा निर्णय घेतला असल्याचे कराचीच्या मंडीवाला एंटरटेनमेंटचे नदीम मंडीवाला यांनी सांगितले. त्यांची कराची व इस्लामाबादमध्ये आठ चित्रपटगृहे आहेत. (वृत्तसंस्था)
कलाकारांमध्ये मतभेद
भारतीय चित्रपटांमध्ये काम करावे का, यावर पाकिस्तानी कलाकारांमध्येही मतभेद असल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे. हमजा अली अब्बासी, आगा अली, शान शहीद यांनी भारतीय चित्रपटसृष्टीशी संबंध ठेवता कामा नये, असे म्हटले आहे, तर साजल अली, अफजल रहेमान या कलावंतांनी असे करणे योग्य नाही व कलेच्या प्रांतात राजकारण आणू नये, अशी भूमिका घेतली आहे.
जनतेचे म्हणणे काय ?
भारतात जशी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली आहे, तशी पाकमध्ये भारतीय कलावंतांवर बंदी घालावी का, यावर तेथील डॉन या वृत्तपत्राने लोकांची मते मागविली होती.
त्यातील ३१८५ लोकांनी बंदी घालण्यात यावी, असे मत व्यक्त केले, तर ३१५७ जणांनी भारतीय कलाकारांवर बंदी घालणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले.
म्हणजेच बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्यांहून बंदी नको असे म्हणणारे २८ नेच कमी यातून भारतीय चित्रपट टीव्ही मालिका आणि कलाकार पाकिस्तानमध्ये किती लोकप्रिय आहेत, याचा अंदाज येतो.
कडेकोट सुरक्षाव्यवस्था
भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून हल्ला केल्यानंतर पंजाबमधील सर्व महत्त्वपूर्ण ठिकाणांची सुरक्षा कडक केली असून, हवाई दलाच्या राज्यातील सर्व तळांना अति सतर्कतेचे आदेश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेजवळील गावांत राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू आहे.
चंदीगड, अंबाला, भटिंडा, आदमपूर आणि हलवाडासह हवाई दलाच्या राज्यातील सर्व तळांना अति सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून, सर्जिकल हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भाखडा धरणाची सुरक्षाव्यवस्था आवळली आहे. सर्व धरणांच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात येत आहे, असे बीबीएमबीचे अध्यक्ष ए.के. शर्मा यांनी सांगितले. पंजाबमधील तेल शुद्धीकरण प्रकल्प व विद्युत केंद्रांसह इतर सर्व महत्त्वपूर्ण केंद्रे आणि त्यांच्या आसपासची सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.
१२ हजार गावकऱ्यांचे स्थलांतर!
जम्मूपासून ७० किमीवर असलेल्या अखनूर भागातील सीमेलगतच्या पल्लनवाला सेक्टरमधील तीन गावांमध्ये पाक सैन्याने शनिवारी पहाटे सुमारे चार तास गोळीबार आणि तोफगोळ््यांचा मारा केला. यामुळे सुमारे १२ हजार गावकऱ्यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले.दरकोटे, प्लाटन व चन्नी देवानू या सीमेवरील गावांमध्ये पहाटे ३ च्या सुमारास सीमेच्या पलिकडून आधी लाइट मशिनगनने गोळीबार व नंतर .८६ मिमी तोफगोळ््यांचा मारा करण्यात आला.