देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 05:13 AM2024-10-28T05:13:29+5:302024-10-28T05:13:47+5:30
६१० हवा गुणवत्ता निर्देशांकासह राजस्थानमधील भिवडी सर्वात धोकादायक स्थितीत होते.
नवी दिल्ली : दिवाळी जवळ आली असतानाच देशभरातील प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. एक्यूआयडॉटइननुसार देशातील ११ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ३००च्या वर गेली आहे. त्यामध्ये भिवडी, दिल्ली, नोएडा, मेरठ, गाझियाबाद, जयपूर, बुलंदशहर, अमृतसर, अलीगढ, सोनीपत आणि फरिदाबाद या शहरांचा समावेश आहे.
६१० हवा गुणवत्ता निर्देशांकासह राजस्थानमधील भिवडी सर्वात धोकादायक स्थितीत होते. याचवेळी दिल्लीची स्थितीही गॅस चेंबरसारखी झाली असून, येथे रविवारी सकाळी आनंद विहारमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक ४००वर होता. आग्रामध्येही प्रदूषण आणि धुक्यामुळे ताजमहाल अस्पष्ट दिसत होता.
मुंबईतील मरिन ड्राईव्हवरही सकाळी धुक्याचा थर पाहायला मिळाला. प्रदूषणामुळे देशाच्या राजधानीची घुसमट होत असताना दिवाळीच्या सणामुळे वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे त्यात आणखीनच भर पडणार असल्याचे चिंता वाढली आहे.