पाक-अफगाणच्या ४,३०० निर्वासितांना भारतीय नागरिकत्व
By admin | Published: June 15, 2015 12:06 AM2015-06-15T00:06:27+5:302015-06-15T00:06:27+5:30
शेजारी देशांमधून आलेल्या सुमारे दोन लाख निर्वासितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्याच्या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तान व
नवी दिल्ली : शेजारी देशांमधून आलेल्या सुमारे दोन लाख निर्वासितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्याच्या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तान व अफगाणिस्तानमधून आलेल्या हिंदु व शिख निर्वासितांना गेल्या वर्षभरात भारताचे नागरिकत्व बहाल केले आहे. याआधीच्या संपुआ-२ सरकारच्या संपूर्ण पाच वर्षांच्या कालखंडात अशा १,०२३ निर्वासितांना नागरिकत्व दिले गेले होते.
वास्तव्याच्या देशात छळ सोसणाऱ्या हिंदुंना भारताचे दरवाजे खुले आहेत, असे धोरण भाजपने जाहीर केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या पुढाकाराने या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व दिले गेले आहे. पाकिस्तान व बांगलादेशातून आलेल्या हिंदु निर्वासितांना इतर भारतीय नागरिकांप्रमाणे वागणूक देण्याचे पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचारातही जाहीर केले होते.
सध्या पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानातून आलेले सुमारे दोन लाख हिंदु निर्वासित भारतात राहात आहेत.
मोदी सरकार गेल्या २६ मे रोजी सत्तेवर आल्यापासून सुमारे १९ हजार निर्वासितांना मध्य प्रदेशत, ११ हजार निर्वासितांना राजस्थानात तर चार हजार निर्वासितांना गुजरातमध्ये दीर्घकालिन वास्तव्यासाठी व्हिसा देण्यात आले आहेत, असे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.
निर्वासितांच्या दीर्घकालिन वास्तव्यासाठीच्या व्हिसाचे अर्ज स्वीकारणे व त्यावर प्रक्रिया करण्याचे सर्व काम आॅनलाइन करण्याची व्यवस्ता केंद्रीय गृह मंत्रालयाने एप्रिलपासून सुरु केली आहे.
कायम स्थायिक होण्याच्या उद्देशाने पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानातून भारतात येणाऱ्या निर्वासितांच्या अडचणी दूर करण्यासाठी असे करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)