शेकडो निर्वासितांना भारतीय नागरिकत्व; सीएए कायद्याची अंमलबजावणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 08:42 AM2024-05-16T08:42:02+5:302024-05-16T08:42:30+5:30
सीएए कायद्याची नियमावली तयार केल्यानंतर दोन महिन्यांनी ही प्रक्रिया सुरू झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यान्वये बुधवारी पहिल्या १४ जणांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. याशिवाय शेकडो जणांना ई-मेलद्वारे भारतीय नागरिकत्वाची डिजिटल प्रमाणपत्रे पाठविण्यात आली. सीएए कायद्याची नियमावली तयार केल्यानंतर दोन महिन्यांनी ही प्रक्रिया सुरू झाली.
केंद्रीय गृह खात्याचे सचिव अजयकुमार भल्ला यांनी एका समारंभात १४ बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र बहाल केले. केंद्र सरकारने तयार केलेल्या एका पोर्टलद्वारे या नागरिकांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केले होते. त्यानुसार त्यांना प्रमाणपत्र देण्यास सुरूवात झाली. पाकिस्तानातील सिंध प्रांतातून ११ वर्षांपूर्वी निर्वासित म्हणून भारतात आलेल्या भारतकुमार यांनाही सीएए कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. ते म्हणाले की, मी आज खऱ्या अर्थाने भारतीय झालो. मला जणू नवीन आयुष्य मिळाले. बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तानातून हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन भारतात आश्रयाला आले, भारतीय नागरिकत्व मिळण्यास सुरुवात झाली. पंतप्रधान मोदी यांनी दिलेले वचन पूर्ण केले, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले.