VIDEO: भारतीय तटरक्षक दलाकडून अरबी समुद्रात अडकलेल्या 264 मच्छिमारांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 07:39 AM2019-12-05T07:39:40+5:302019-12-05T07:40:58+5:30
व्यापारी जहाजांच्या मदतीनं तटरक्षक दलाचं रेस्क्यू ऑपरेशन
मुंबई: भारतीय तटरक्षक दलानं व्यापारी जहाजांच्या मदतीनं अरबी समुद्रात अडकलेल्या २६४ मच्छिमारांची सुटका केली आहे. अचानक हवामान बिघडल्यानं मच्छिमारांच्या ५० बोटी समुद्रात अडकल्या होत्या. याबद्दलची माहिती तामिळनाडूमधील मच्छिमार संघटनांकडून भारतीय तटरक्षक दलाला मिळाली. पश्चिम गोव्यापासून २५० नॉटिकल मैल अंतरावर मच्छिमार बोटी अडकल्या होत्या. तटरक्षक दलानं तातडीनं मदतकार्य सुरू करत सर्व मच्छिमारांची सुखरुप सुटका केली.
खराब हवामानामुळे ५० मच्छिमार बोटी समुद्रात अडकल्याची माहिती ३ डिसेंबरला भारतीय तटरक्षक दलाला मिळाली. भरसमुद्रात अडकलेल्या मच्छिमारांना तातडीनं मदत देणं गरजेचं असल्यानं तटरक्षक दलानं या भागात असणाऱ्या सात व्यापारी जहाजांशी संपर्क साधत त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. या जहाजांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे अडकलेल्या मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला. यानंतर लगेचच तटरक्षक दलाच्या बोटी मच्छिमारांच्या सुटकेसाठी रवाना झाल्या.
#WATCH: Indian Coast Guard rescued 264 fishermen who were stranded in Arabian Sea, owing to rough sea conditions on December 3. (Source: Indian Coast Guard) pic.twitter.com/b5kSJ88mEi
— ANI (@ANI) December 5, 2019
भारतीय व्यापारी जहाज नवधेनू पूर्णानं ८६ मच्छिमारांची सुटका केली. तर जपानच्या एम व्ही तोवाडा जहाजानं ३४ मच्छिमारांची सुटका केली. भारतीय तटरक्षक दलाच्या विनंतीवरुन मॅरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटरनं या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. मॅरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटरच्या सूचनेवरुन आणखी पाच व्यापारी जहाजं या अभियानात सहभागी झाली. त्यामुळे २६४ मच्छिमारांची सुटका झाली.
Presently, Indian Coast Guard ships Samudra Prahari, Samar, Savitribai Phule, Amal and Apoorva are augmenting the ongoing rescue operation, along with Coast Guard Dornier Aircraft for Sea-Air coordinated operations. https://t.co/OsJ8Olph4e
— ANI (@ANI) December 5, 2019
मच्छिमारांची सुटका केल्यानंतर त्यांना खाद्यपदार्थ आणि प्रथमोपचार देण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या सर्व मच्छिमारांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलानं दिली आहे. तटरक्षक दलाच्या समुद्र प्रहरी, समर, सावित्रीबाई फुले, अमल आणि अपूर्वा या जहाजांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. याशिवाय तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टरदेखील या मोहिमेत सहभागी झालं होतं.