Pulwama Attack : पाकिस्तानी महाधिवक्त्याला केला दुरूनच 'रामराम'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 12:10 PM2019-02-19T12:10:18+5:302019-02-19T12:12:28+5:30
भारतीय हेर असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेले कुलभूषण जाधव यांच्यावरील शिक्षेविरोधात काल आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली.
सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या पुलवामामधील हल्ल्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटू लागले आहेत. कुलभूषण जाधव यांच्यावरील शिक्षेविरोधात काल आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणीवेळी पाकच्या महाधिवक्त्याला भारताच्या संयुक्त सचिवांनी दुरुनच रामराम करत निषेध व्यक्त केला.
भारतीय हेर असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेले कुलभूषण जाधव यांच्यावरील शिक्षेविरोधात काल आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी समोरासमोर आलेल्या पाकिस्तानी महाधिवक्ता अन्वर मंसूर खान यांनी भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव दीपक मित्तल यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मित्तल यांनी सावरत दुरुनच रामराम करत नाराजी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात याआधीही विविध प्रकरणांत दोन्ही देशांचे अधिकारी भेटत असतात. यानुसार नेहमीप्रमाणे अन्वर मंसूर खान यांनी भारतीय अधिकाऱ्यांना पाहताच हात पुढे केला होता. हे पाहून मित्तल यांनी सर्वांसमक्षच नकार देत हात पुढे करायचे टाळत नमस्कार केला. मित्तल एवढ्यावरच न थांबता मंसूर यांच्या बाजुला असलेले नेदरलँडमधीस भारताचे राजदूत वेणु राजामोनी यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. यामुळे पाकिस्तानी महाधिवक्त्याचा चेहरा चांगलाच उतरला होता.
मित्तल यांनी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांच्याशीही हात मिळविला नाही. यानंतर पाकिस्तानी अधिकारी कुलभूषण यांची बाजू मांडणारे भारतीय वकील हरीश साळवे यांच्याकडे वळले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केले.
The Hague (Netherlands): International Court of Justice (ICJ) starts public hearing in Indian National Kulbhushan Jadhav case pic.twitter.com/UfdZgZ8Qov
— ANI (@ANI) February 18, 2019
कुलभूषण जाधव प्रकरणात भारताकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडताना दीपक मित्तल म्हणाले की, याआधी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सव्वाशे कोटी भारतीयांच्या मनात अपेक्षा निर्माण झाली होती. पाकिस्तान एका निर्दोष भारतीयाच्या अधिकारांची गळचेपी करत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशांचेही व्यवस्थित पालन करत नाही आहे, असा आरोपही मित्तल यांनी केला.
यावेळी यांनी कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानने केलेल्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला. तसेच पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले असून, तब्बल 13 वेळी विनंती करूनही कुलभूष जाधव यांना कौन्सिलर अॅक्सेस दिलेला नाही. कुलभूषण जाधव हे निर्दोष आहेत, मात्र पाकिस्तान त्यांना फसवून आपला अजेंडा पुढे रेटू पाहत आहे, असा आरोपही साळवे यांनी केला.
पाकच्या न्यायाधीशांना आला हृदयविकाराचा झटका
कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेविरोधातील भारताच्या आक्षेपावर आयसीजेमध्ये सुनावणी सुरु होती. यावेळी पाकिस्तानचे न्यायाधीश टी. एच. गिलानी (69) यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.