भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ७.९ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2016 04:40 AM2016-06-01T04:40:51+5:302016-06-01T04:40:51+5:30
२0१५-१६ या आर्थिक वर्षात मार्चला संपलेल्या तिमाहीतील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ७.९ टक्के राहिला. त्याबरोबर भारताने जगात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांत आपले स्थान अधिक बळकट केले आहे
नवी दिल्ली : २0१५-१६ या आर्थिक वर्षात मार्चला संपलेल्या तिमाहीतील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ७.९ टक्के राहिला. त्याबरोबर भारताने जगात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांत आपले स्थान अधिक बळकट केले आहे. मागील सलग पाच वर्षांत वाढीचा वेग ७.६ टक्के ठेवण्यात भारताला यश आले आहे.
गेल्या वर्षी मार्चला संपलेल्या तिमाहीतील भारताचा वृद्धीदर ७.२ टक्के होता. या पार्श्वभूमीवर २0१५-१६ मधील वृद्धीदर चकित करणारा आहे. अर्थव्यवस्थेतील सुधारणेमुळे उत्साहित झालेल्या सरकारने चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ८ टक्के असू शकतो, असे म्हटले आहे. भारताची अर्थव्यवस्था ८ टक्क्यांची वृद्धी प्राप्त करण्यास सक्षम आहे, असे वित्त सचिव शक्तीकांत दास यांनी सांगितले. सेंट्रल स्टॅटिस्टिक्स आॅफिसच्या (सीएसओ) वतीने यासंबंधीची अधिकृत आकडेवारी जारी करण्यात आली आहेत. या आकडेवारीनुसार वस्तू उत्पादन क्षेत्रातील वाढीचा दर ९.३ टक्के राहिला. कोअर क्षेत्रातील वाढ ८.५ टक्क्यांवर होती. गेल्या ४ वर्षांतील हा सर्वोच्च आकडा ठरला आहे.