CoronaVirus: देशाची अर्थव्यवस्था संकोचण्याची भीती; सीआयआयचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 03:21 AM2020-04-25T03:21:24+5:302020-04-25T07:01:51+5:30
जर परिस्थिती लवकर सुधारली तर अर्थव्यवस्थेच्या विकासदरामध्ये १.५ टक्क्यांपर्यंतच वाढ होण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) उणे ०.९ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची भीती कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने (सीआयआय) व्यक्त केला आहे. जर परिस्थिती लवकर सुधारली तर अर्थव्यवस्थेच्या विकासदरामध्ये १.५ टक्क्यांपर्यंतच वाढ होण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याचीच मोठी शक्यता आहे. एकूण देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर ०.६ टक्के राहू शकतो. परंतु जर अर्थव्यवस्थेला चांगली गती मिळाली तर एकूण देशांतर्गत उत्पादनाचा दर १.५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, मात्र अनेक दशकांमधील हा नीचांक असण्याची स्थिती आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने पुढे म्हटले आहे की, लॉकडाउन संपल्यावर आर्थिक व्यवहार सुरू होतील, पण ते सामान्य होण्यास काहीवेळ लागेल. देशातील काही भागांना हॉटस्पॉट घोषित केले आहे. त्याठिकाणी लॉकडाउन संपण्यास वेळ लागेल. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेला सर्वत्र सारखी गती मिळणे कठीण होईल. त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
मदतीचा हात देण्याची गरज
अर्थव्यवस्था कठीण काळातून जात आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने देशातील उद्योगांना विविध सवलती देण्याची गरज असल्याचे सीआयआयने म्हंटले आहे. सरकारने उद्योगांना आर्थिक सवलतींचे पॅकेज तातडीने जाहीर करण्याची गरज आहे. छोट्या आणि मध्यम उद्योगांना अधिक सवलती पुरविणे गरजेचे आहे. या उद्योगांना अधिक खेळते भांडवल सरकारने पुरवावे, असेही सीआयआयने सुचविले आहे.