भारतीय अर्थव्यवस्था यंदा ब्रिटनला मागे टाकणार; 'या' स्थानावर घेणार झेप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 08:50 AM2019-06-04T08:50:23+5:302019-06-04T08:51:53+5:30
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले आहे.
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेला लवकरच अच्छे दिन येणार असून यंदा ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. आयएचएस मार्केटच्या अहवालात ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच 2025 पर्यंत भारत जपानलाही मागे सोडून आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. यामुळे त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाक आर्थिक परिदृष्य सकारात्मक दिसत आहे. 2019-23 दरम्यान जीडीपी सरासरी वाढ ही सात टक्के राहणार आहे.
2019 मध्ये भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. देशाची जीडीपी 3000 अब्ज डॉलर म्हणजेच 2.10 लाख अब्ज रुपयांवर पोहोचणार आहे. अशाप्रकारे भारत ब्रिटेनला मागे सोडेल. तसेच 2025 पर्यंत आशियातील दुसरे स्थान पटकावेल.
अहवालानुसार भारत जगभरातील मोठ्या अर्थव्यवस्थांच्या रॅकिंमध्ये पुढे सरकत राहणार आहे. तसेच जागतिक जीडीपी वाढीमध्येही भारताचे योगदान असणार आहे. भारत आशियाई देशांसाठी आर्थिक वाढीचे इंजिन असणार आहे. यामुळे आशियातील व्यापार आणि गुंतवणुकीसाठी महत्वाची भुमिका निभावणार आहे.
पुढील दोन दशकांमध्ये प्रती वर्षी 75 लाख लोकांना काम मिळत राहणार आहे. कारण जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचा हिस्सा 18 टक्के आहे. तर लक्ष्य 25 टक्के ठेवण्यात आले आहे. मात्र, मोदी सरकारवर उत्पादन आणि सेवा क्षेत्रात रोजगारवाढीसाठी मोठा दबाव असणार आहे.