भारतीय सण देतात समानतेचा संदेश
By admin | Published: November 29, 2015 12:52 AM2015-11-29T00:52:45+5:302015-11-29T00:52:45+5:30
भारतीय सण समानतेचा संदेश देतात असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. पंतप्रधान मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत
नवी दिल्ली : भारतीय सण समानतेचा संदेश देतात असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.
पंतप्रधान मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत येथील भाजपा मुख्यालयात पत्रकारांसोबत दिवाळी मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले, भारतीय सणांमधून समाजाला नवी प्रेरणा मिळते. दीपोत्सवसुद्धा असाच सण आहे. यात कुठलाही भेदभाव पाळला जात नाही. उलट या प्रकाशोत्सवाने समानतेचे मूल्य अधिक बळकट होते.
आमच्या समाजात लोकांना परस्परांशी जोडण्याच्या दृष्टीने सण ही फार मोठी शक्ती आहे. ते समाजाला नवी गती, ऊर्जा आणि उत्साह देतात, अशी भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी हे वर्ष देशाच्या लोकशाही परंपरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सेल्फीसाठी पत्रकारांची गर्दी
दिवाळी मनोमिलन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी पत्रकारांनी एकच गर्दी केली. त्यामुळे गोंधळ उडाला. संबोधनानंतर मोदी आणि शहा यांनी व्यासपीठावरून खाली उतरून प्रत्येक पत्रकाराची भेट घेणे सुरू केले. परंतु सेल्फीचा सपाटा सुरू होताच गोंधळ निर्माण झाला. विशेष म्हणजे मोदी यांनी सर्वांसोबत आनंदाने सेल्फी घेतली आणि कुणालाही निराश केले नाही.