पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू
By Admin | Published: September 18, 2015 02:58 PM2015-09-18T14:58:24+5:302015-09-18T16:08:46+5:30
सीमा रेषेवरील गोळीबारामुळे भारत - पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण बनले असतानाच आता गुजरातजवळील समुद्रात पाकिस्तानी नौदलाच्या गोळीबारात एका भारतीय मच्छिमाराचा मृत्यू झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १८ - सीमा रेषेवरील गोळीबारामुळे भारत - पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण बनले असतानाच आता गुजरातजवळील समुद्रात पाकिस्तानी नौदलाच्या गोळीबारात एका भारतीय मच्छिमाराचा मृत्यू झाला आहे. भट्टी इक्बाल अब्दुल असे मच्छिमाराचे नाव असून याप्रकरणी भारतीय तटरक्षक दलाने चौकशीला सुरुवात केली आहे.
शुक्रवारी गुजरातमधील ओखा बंदराजवळ मच्छिमारांच्या दोन बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. या दरम्यान त्यांच्यावर पाकिस्तानी नौदलाच्या जवानांनी गोळीबार केला. या गोळीबारात इक्बाल नामक मच्छिमाराचा मृत्यू झाला. भारत व पाकिस्तानमधील मच्छिमार ब-याचदा मासेमारी करताना आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत प्रवेश करतात. पण ही घटना भारताच्या हद्दीत घडल्याचे सांगितले जाते. या घटनेची वृत्त कळताच तटरक्षक दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाली असून पाकिस्तानी नौदलाच्या बोटींचा शोध सुरु आहे. परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेची माहिती मागवली आहे.